चिपळूण- चिपळुणातील शिवसेनेच्या फुटीच्या पार्श्वभूमीवर सर्वांचे डोळे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सभेकडे लागले आहेत. नवरात्रौत्सवानंतर पुढील महिन्याच्या पंधरवड्यात चिपळूणमध्ये ही विराट सभा होणार आहे. त्या दृष्टीने शिंदे गटातील कार्यकर्ते कामाला लागले असून, ही सभा जिल्ह्यातील राजकीय वातावरण बदलून टाकणार आहे.
मुख्यमंत्र्यांच्या सभेपूर्वी शिव संवाद यात्रा जिल्ह्यात आली. या सभेने राजकीय वातावरण ढवळून निघाले. शिवसेना नेते आ. भास्कर जाधव व शिंदे गटाचे नेते रामदास कदम यांच्यात कलगीतुरा रंगला. जिल्ह्यातील तीन मतदारसंघात रत्नागिरी, दापोली व चिपळूणमध्ये मोठी फूट पडणार आहे. त्यामुळे या सभेला महत्त्व आले आहे. कोकणातील ही सभा मोठी होईल, असा विश्वास शिंदे गटातील समर्थक व्यक्त करीत आहेत. त्यामुळे जिल्ह्याच्या राजकारणाला नवी दिशा देणारी ही सभा ठरणार असून, त्याकडे जिल्ह्यासह कोकणवासीयांचे लक्ष लागून राहिले आहे.


