रत्नागिरी- मुलगा कँसरने आजारी असल्याने आर्थिक मदतीची मागणी करणाऱ्या महिलेला मुले पळवणारी महिला असल्याच्या गैरसमजातून राजीवडा – कर्ला येथील पालकांच्या जमावाने मारहाण केली .पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार , ही घटना गुरुवारी सकाळच्या सुमारास मेस्त्री हायस्कुलजवळ घडली . सारिका धुमाळ ( २९ , मुळ रा . परभणी सध्या रा . खेडशी , रत्नागिरी ) असे मारहाण झालेल्या महिलेचे नाव आहे .
सारिका धुमाळ गुरुवारी सकाळी तिचा मुलगा खेडशी येथे आजारी असून उपचारांसाठी मदत मिळवण्याच्या अपेक्षेने मेस्त्री हायस्कुलमध्ये गेली होती . त्यावेळी ती शाळेतील प्राथमिक वर्गांजवळ गेली असता तेथे पालकांची सभा सुरु होती . त्या महिलेला पाहून पालकांनी ही महिला कोण आणि इथे कशी आली ? अशी विचारणा शाळेतील शिक्षकांकडे केली. परंतू शिक्षकही या सर्व प्रकाराने गोंधळून गेले होते . दरम्यान पालकांनी गेल्या काही दिवसांपासून सोशल मिडीयावर व्हायरल होणाऱ्या काही व्हिडीओंवर विश्वास ठेवून ही महिला मुले पळवण्यासाठीच शाळेत आली असल्याचा गैरसमज करुन राजीवडा आणि कर्ला येथील इतर पालकांना फोन करुन बोलावून घेतले . काही वेळातच शाळेत आणखी पालक जमा झाले . त्यातील महिला पालकांनी त्या महिलेला मारहाण केली . त्यानंतर शाळेच्या शिक्षकांनी मध्यस्थी करत महिलेची पालकांपासून सुटका करुन तिला वैद्यकिय मदत देउन शहर पोलिसांच्या हवाली केले.


