वेंगुर्ला प्रतिनिधी – रमाई आवास योजना (शहरी) अंतर्गत लाभ मिळालेल्या आनंदवाडी येथील लाभार्थ्यांना २८ सप्टेंबर रोजी प्रत्येकी १ लाख २५ हजार रुपयांचा धनादेश वितरीत करण्यात आला.
लाभार्थ्यांमध्ये आनंदवाडी येथील चंद्रकांत कृष्णा जाधव, विश्राम सोमाजी जाधव, सुहासिनी अनंत कांबळे, बाबी रघुनाथ जाधव आणि गोपाळ वासुदेव जाधव यांचा समावेश आहे. धनादेश वितरीत करण्याचा कार्यक्रम वेंगुर्ला नगरपरिषद कार्यालयात संपन्न झाला. यावेळी मुख्याधिकारी डॉ.अमितकुमार सोंडगे, कार्यालयीन अधिक्षक संगिता कुबल, नगरपालिकेचे नगररचनाकार प्रितम गायकवाड, लेखापाल आनंद परब आदी उपस्थित होते. रमाई आवास योजना (शहरी) अंतर्गत समाज कल्याण विभागाकडे अजूनही निधी शिल्लक असून अनुसूचित जाती जमातीतील नागरिकांनी लवकरात लवकर नगरपरिषदे कडे आपले प्रस्ताव सादर करावेत असे आवाहन केले आहे.


