सिंधुदुर्ग जिल्ह्यातील अनेक देवस्थाना शेकडो वर्षाचा इतिहास आणि परंपरा लाभली आहे. ऐतिहासिक वारसा लाभलेल्या व ८४ खेडयांचा अधिपती असलेल्या साळशी येथील इनामदार श्री देव सिद्धेश्वर पावणाई देवस्थानचा नवरात्रोत्सव व दसरोत्सव ऐतिहासिक शाही थाटात पारंपारिक रितीरिवाजानुसार साजरा करण्यात येतो. सिंधुदुर्ग जिल्ह्यात सुमारे ४०० वर्षांपूर्वी तालुके नव्हते महालांची संकल्पना अस्तित्वात होती या जिल्ह्यात साळस महाल पाटण महाल कुडाळ महाल असे तीन महाल होते या देवस्थानाचा समावेश साळस महालात होतो महाल म्हणजे तालुक्याचे ठिकाण होय त्यामुळे मुख्य बाजारपेेठ या ठिकाणी भरत असे या महालात बारा बलुतेदार होते या महालाच्या नावाने ओळखली जाणारी वजने मापे आजही शाबूत आहेत. विशेषत : ‘साळस पायली’ हा शब्दप्रयोग जिल्ह्यात प्रचलित आहे
खारेपाटण येथील पियाली नदीपासून कणकवली येथील गडनदीपर्यंत आणि सह्याद्रीच्या पायथ्या पासून ते देवगड आचरा अरबी समुद्रापर्यंत ची ८४ खेडी तथा देवस्थाने या देवस्थानच्या अखत्यारित येतात म्हणून या देवस्थानाला ‘८४ खेड्यांचा अधिपती’ असे म्हणतात
या देवस्थानाला कोल्हापूर येथील स्वामी छत्रपती शंभुराजे यांनी शालीवाहन शके १६४४ (इ स १७२२)मध्ये सनद दिली. स्वामी छत्रपती शंभुराजे यांनी दिलेली सनद ग्राह्य मानुन ब्रिटिश सरकारने ३० ऑगस्ट १८६४ मध्ये या देवस्थानाला सनद दिली. या सनदीत देवस्थान विश्वस्त समिती कडे जमा केलेल्या महसूला पैकी १/८ महसूल शासनाकडे जमा करावयाचा आहे उर्वरित महसूल या देवस्थानच्या पूजा अर्चा नंदादीप व वार्षिक उत्सवासाठी वापरण्यात यावा असा उल्लेख आहे. आणि विशेष म्हणजे साळशी गावातील देवस्थान कारभार या सनदी प्रमाणे आजही सुरू आहे
साळशी गावात प्रवेश करताच इनामदार श्री देव सिद्धेश्वर व श्री देवी पावणाई हि पुरातन इतिहासकालीन भव्य देवालये दृष्टीस पडतात. श्री देव सिद्धेश्वराचे भव्य मंदिर असून या मंदिरात नंदीची महाकाय दगडी मूर्ती आहे. गाभाऱ्यात शिवाची पिंडी आहे. या मंदिराचा नुकताच जिर्णोध्दार करण्यात आला आहे. या देवस्थानातील सर्वात मोठे प्राचीन कलाकुसरीने आकर्षक सजविलेले श्री पावणाई देवीचे मंदिर आहे. या देवालयाच्या प्रवेश पायरी वरूनच श्री पावणाई देवीचे मनोहरी दर्शन घडते. काळया पाषाणातील कोरलेली श्री पावणाई देवीची अंत्यत सुबक रेखीव मुर्ती आहे बाजूला सतत तेवणारा नंदादीप आहे. उत्सव काळात या देवतांना वस्त्रालंकारानी सजविण्यात येते.या मंदिराचा गाभारा तरंग भाग गाभाऱ्या पुढील भाग पालखी भाग भव्य सभामंडप असे प्रमुख भाग आहेत. या मंदिरात प्रचंड लाखडी खांबांनी तोललेली तक्तपोशी आहे. दोन माणसाच्या कवेत जेमतेव मावतील एवढा एकेका खाबांचा परिघ आहे. प्रत्येक खाबांचा वरील निम्म्या भाग कोरीव नक्षीकाम युक्त आहे तसेच या मंदिरातील कमानीवर तसेच दरवाजाच्या चौकटीवरही कोरीव नक्षीकाम आहे .या नक्षीकामावर रंगकाम केल्यामुळे अधिक विलोभनिय वाटते. दोन्ही देवालयाच्या चारही बाजूला चिऱ्याची तटबंदी आहे मंदिराच्या भोवतालच्या भाग चिऱ्यानी फरसबंद केला आहे.या दोन्ही मंदिराच्या एका बाजूला भव्य दीपमाळा प्रशस्त तुळशी वृंदावन धर्मशाळा आहेत या धर्म शाळेजवळ पुरातन ऐतिहासिक दोन तोफा उभ्या असल्याची साक्ष देतात. तसेच छोटी मोठी स्मारके आहेत नाथ संप्रदायातील मंदिरे आहे
या देवस्थानाचे भावई उत्सव, श्रावण सोमवार नारळीपौर्णिमा दहिहंडी नवरात्रोत्सव व विजयादशमी कार्तिकोत्सव दीपपुजा शिमगोत्सव असे वार्षिक उत्सव साजरे केले जातात हे सर्व उत्सव श्री देव सिध्देश्वर पावणाई इनाम देवस्थान विश्वस्त समिती बारा पाच मानकरी भक्त गण एकत्र येवून साजरे करतात तसेच हरिनाम सप्ताह मोठ्या उत्साहात साजरा करण्यात येतो. हे ऐतिहासिक उत्सव आजही लोकशाहीत पारंपारिक रितीरिवाजानुसार साजरे करण्यात येतात
श्री सिध्देश्वर व श्री पावणाई या दोन प्रमुख देवालयाबरोबर इतर १० प्रमुख देवालये आहेत त्यांना स्थळे म्हणतात.
या देवस्थानाचा नवरात्रोत्सव व विजयादशमी ऐतिहासिक शाही थाटात साजरा करण्यात येतो. या निमित्त देवावलय आकर्षक विदुत रोषणाईने सजविण्यात येते देव देवतांना वस्त्रालंकारानी सजविण्यात येते. देव- देवतरंगाना सजविण्यात येते श्री पावणाई देवायलात घटस्थापना करण्यात येते.उत्सव काळात सप्तशती पाठाचे वाचन देवीची ओटी भरणे आरती नैवैद्य घडशी-गोंधळी यांचे गायन प्रवचन पालखी प्रदक्षिणा किर्तन या दररोजच्या कार्यक्रमाबरोबर नववदिवशी नवचंडी पाठाचे वाचन नवचंडी होम नाट्यप्रयोग लळीत कार्यक्रमानंतर काकड आरतीने या उत्सवाची सांगता होते. श्री पावणाई देवीची मुर्ती बसविण्यात आलेली पालखी भालदार चोपदार अबदागीर निशाणदार चौरवीदार मशालदार घडशी- गोंधळी बारा पाच मानकरी असंख्य भक्तगणांच्या लव्याजम्यासह ढोलताशांच्या गज।रात राजवैभवाच्या थाटात प्रदक्षिणा निघते.या कार्यक्रमाच्या सुरवाती पासुन ते कार्यक्रमाची सांगता होईपर्यंत गणवेशातील पहारेकरी देवा समोर खडा पहारा देतात. उत्सवकाळात दुरवरुन घडशी गोंधळी किर्तनकार देवीची सेवा करण्यासाठी येतात. दुसऱ्या दिवशी दसरोत्सव ऐतिहासिक शाही थाटात साजरा करण्यात येतो
या दिवशी दुपारी वस्त्रभुषणांनी सजविलेले देवतरंग (शिवकळा) काढण्यात येतात .शिवकळेकडून सिमोल्लघंनाचा हुकूम घेऊन ढोल ताशांच्या गजरात हरहर महादेवाच्या जय घोषात तरंगाबरोबर निशाणदार,भालदार चोपदार मशालदार चौरवीदार अबदागीर घडशी- गोंधळी देवाचे सेवेकरी अशा लव्याजम्यासह बारा पाच मानकरी ग्रामस्थ असंख्य भक्तगण सिमोल्लघंनासाठी जाते
नवरात्रोत्सवात देवीच्या दर्शनासाठी व देवीची ओटया भरण्यासाठी व कृपाशीर्वाद घेण्यासाठी दुरवरुन माहेरवाशिणी येतात चाकरमान्यांची उपस्थित लक्षणीय असते असख भकगणाच्याअलोट गर्दीत मंदिर परिसर फुलून जातो. व गावात भक्तीमय वातावरणात निर्मिती होते. ऐतिहासिक कालीन हे उत्सव लोकशाहीतही पारंपारिक रितीरिवाज नुसार साजरे केले जातात.


