Sindhudurg:जिल्ह्यातील प्रत्येक गावाने संत गाडगेबाबा ग्रामस्वच्छता अभियानात भाग घेण्याचे आवाहन

0
44
संत गाडगेबाबा ग्रामस्वच्छता अभियान

ओरोस: ग्रामीण भागातील जनतेचे आरोग्यमान, जीवनस्तर उंचावण्यांसाठी राज्य शासनाकडून विविध अभियान राबविण्यात येतात. परिसर स्वच्छता आणि नागरिकांच्या सक्रिय सहभागातून संत गाडगेबाबा ग्रामस्वच्छता अभियान पुन्हा अधिक जोमाने राबविण्यात येणार आहे.या अभियानाला दिनांक 11 ऑक्टोबर पासूनच सुरुवात झाली आहे. दिनांक 15 नोव्हेंबर पर्यंत हे अभियान राबविण्यांत येणार आहे. या अभियानात जिल्ह्यातील सर्व ग्रामपंचायतीनी सहभाग घ्यावा, असे आवाहन जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी प्रजित नायर यांनी केले आहे.

गावागावात निर्माण होणाऱ्या स्वच्छतेच्या नव्या सुविधा, नागरिकांचे स्वच्छतेबाबतीत होणारे मत परिवर्तन व स्वच्छतेच्या चळवळीत ग्रामीण भागातील सर्व ग्रामस्थांचा सक्रिय व सातत्यपूर्ण सहभाग घेणे हे संत गाडगेबाबा ग्रामस्वच्छता अभियानाचे वैशिष्ट्य आहे. राज्यातील ग्रामपंचायती, तालुके व जिल्हयांत स्वच्छतेच्या विविध पैलूतील प्रगतीबाबत एक सर्वसमावेशक स्पर्धा राबविण्यांत येते. राज्यात या अभियानाच्या माध्यमातून ग्रामस्थांना प्रोत्साहित करून स्वच्छतेच्या कार्यक्रमाचा आपलेपणा व महत्व पटवून देण्यात येत आहे.

संत गाडगेबाबा ग्राम स्वच्छता अभियानाच्या माध्यमातून महाराष्ट्रात स्वच्छतेचा जागर निर्माण करणे, ग्रामपंचायतीत समाविष्ट्य गावांतील वैयक्तिक शौचालये, त्यांचा वापर, हागणदारीमुक्त तपासणीचा अहवाल त्यानुषंगाने दुरुस्त करावयाची शौचालये, एक खड्डा ते दोन खड्डा करावयाची शौचालये, गावे हागणदारीमुक्त म्हणून घोषित करण्याकरिता करावयाची कार्यवाही व पूर्तता याबाबत ठोस कृती कार्यक्रम आखून 15 नोव्हेंबरपर्यंत ही कार्यवाही करावयाची आहे. स्वच्छतेच्या या महायज्ञात नागरिक, कर्मचारी, अधिकारी तसेच लोकप्रतिनिधीनी सक्रिय सहभाग देवून, संत गाडगेबाबा ग्राम स्वच्छता अभियानात भाग घ्यावा असे आवाहन जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी प्रजित नायर व उपमुख्य कार्यकारी अधिकारी विनायक ठाकूर यांनी केले आहे.

स्वच्छ ग्राम स्पर्धा पुरस्कार जिल्हा परिषद गटस्तरावर प्रथम रु.60,000/-रु. जिल्हास्तर प्रथम रु. 6 लक्ष, द्वितीय रु. 4 लक्ष, तृतीय रु. 3 लक्ष, विभागस्तर प्रथम रु. 12 लक्ष, व्दितीय रु. 9 लक्ष, तृतीय रु. 7 लक्ष, राज्यस्तर प्रथम रु.50 लक्ष, व्दितीय रु. 35 लक्ष, तृतीय रु. 30 लक्ष याशिवाय जिल्हा विभाग व राज्य स्तरावर प्रथम, द्वितीय व तृतीय क्रमांकावर आलेल्या ग्रामपंचायती वगळून जिल्हा, विभाग व राज्य स्तरावर संबंधित ग्रामपंचायतींना विशेष पुरस्कार ही देण्यात येणार आहेत.

विशेष पुरस्कार पुरस्काराचे नाव स्व. वसंतराव नाईक पुरस्कार घनकचरा व सांडपाणी व मैला गाळ व्यवस्थापन. जिल्हा स्तर 50 हजार, विभागस्तर 75 हजार, राज्य स्तर 3 लाख रुपयाचे पुरस्कार राहणार आहेत. डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुरस्कार पाणी गुणवत्ता व पाणी व्यवस्थापन, जिल्हा स्तर 50 हजार, विभागस्तर 75 हजार, राज्य स्तर 3 लाख, याच प्रमाणे स्व. आबासाहेब खेडकर पुरस्कार शौचालय व्यवस्थापन पुरस्कारासाठी देण्यात येणार आहे.

याशिवाय, वेगवेगळ्या महत्त्वाच्या बाबीसंदर्भातील कामगिरीकरिता ग्रामपंचायत, ग्रामपंचायत कर्मचारी व शासकीय कर्मचारी , अधिकाऱ्यांनासुध्दा अनेक पुरस्कार या स्पर्धेत देण्यात येणार आहे. राज्यस्तरीय तपासणी दिनांक दिनांक 15 ऑक्टोबर 2022 पासुन सुरु संत गाडगेबाबा ग्रामस्वच्छता अभियान सन 2018-2019 व सन 2019-20 ची राज्यस्तरीय तपासणी दिनांक 15 ऑक्टोबर 2022 पासुन सुरु होणार आहे. दिनांक 15 ऑक्टोबर रोजी संत गाडगेबाबा ग्रामस्वच्छता अभियान सन 2018-19 मध्ये विभागस्तरावर पहिला क्रमांक प्राप्त केलेल्या ग्रामपंचायत हुमरस ता. कुडाळ ची तपासणी होणार आहे. तर दिनांक 16 ऑक्टोबर रोजी संत गाडगेबाबा ग्रामस्वच्छता अभियान सन 2019-20 मध्ये विभागस्तरावर प्रथम क्रमांक प्राप्त ग्रामपंचायत बापर्डे तालुका देवगड तर दिनांक 17 ऑक्टोबर रोजी विभागस्तरावर व्दितीय क्रमांक प्राप्त ग्रामपंचायत परुळेबाजार ता. वेंगुर्ला यांची तपासणी होणार आहे. या राजयस्तरीय तपासणी समितीत चंद्रकांत मोरे, अवर सचिव पाणी पुरवठा व स्वच्छता विभाग, मंत्रालय मुंबई, बाळासाहेब हजारे, कक्ष अधिकारी, पाणी पुरवठा व स्वच्छता विभाग, मंत्रालय मुंबई, रमेश पात्रे, सहाय्यक कक्ष अधिकारी, पाणी पुरवठा व स्वच्छता विभाग, मंत्रालय मुंबई असणार आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here