मुबंई – मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचे छत्रपती शिवाजी महाराजांप्रती असलेले प्रेम अवघ्या महाराष्ट्राला माहिती आहे. तसेच राज ठाकरे यांना चित्रपटाविषयी असलेली आत्मीयता देखील अनेकदा समोर आली आहे. याच दोन्हही गोष्टींचा संगम घालत राज ठाकरेंनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्यावर चित्रपट बनवत असल्याची माहिती दिली. निमित्त होत ‘हर हर महादेव’ चित्रपटाच्या शिवस्मरण मुलाखतीचे!
‘हर हर महादेव’ या चित्रपटाला स्वतः राज ठाकरे यांनी सह्याद्री म्हणून आवाज दिला आहे. त्यानिमित्त अभिनेता सुबोध भावे याने राज ठाकरेंची मुलाखत घेतली. ही मुलाखत केवळ आणि केवळ छत्रपती शिवाजी महाराज आणि हर हर महादेव या चित्रपटाबाबत होती. यावेळी ठाकरेंनी छत्रपती शिवाजी महाराजांचे अनेक पैलू उलगडण्याचा प्रयत्न केला. महाराज लढाई,किल्ले याच्यापलीकडे जाऊन एक विचार असल्याचे देखील राज ठाकरे या वेळी म्हणाले.
राज ठाकरेंनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या आयुष्यावर चित्रपट बनवण्याचीही इच्छा व्यक्त केली. याविषयी बोलताना ते म्हणाले की, “आता सर्व प्लॅटफॉर्म बदलले आहेत, फिल्ममेकिंग बदललं आहे. याबाबत माझे काम सुरू आहे पण मी आता जास्त काही सांगत नाही. मात्र मी याबाबत काम दिलं आहे” राज ठाकरे यांनी दिलेल्या माहितीनुसार दोन ते तीन भागात छत्रपती शिवाजी महाराज यांच्यावर चित्रपट आणण्याचा त्यांचा विचार असलयाचे समजते.


