देवबाग : शशांक कुमठेकर
बहुचर्चित पर्यटनाची पंढरी म्हणून समजल्या जाणाऱ्या देवबाग हे गाव नेहमीच कुठच्या ना कुठच्या समस्येने ग्रासले गेले आहे. कर्ली नदी व अरबी समुद्र यांच्या संगमाच्या भुभागावर देवबाग वासियांची एकमेव हिंदू स्मशानभूमी होती. ही स्मशानभूमी काही वर्षांपूर्वी वाहुन गेल्यांने स्मशानभूमीचा हा प्रश्न कित्येक वर्ष आवासून उभा आहे. अलीकडेच खासदार निधीतून देशाचे उद्योगमंत्री नारायण राणे यांनी या स्मशानभूमी बांधकामांसाठी पाच लाखांचा निधी मंजूर केला असला तरीही हा निधी देण्यासाठी चालढकल होताना दिसत आहे. काही विधायक कामे तातडीने होणे आवश्यक असून गावपातळी बरोबर तालुका पातळीवरील अधिकारी मुग गिळून गप्प बसले असल्याचे चित्र दिसत आहे. त्यामुळे देवबागच्या स्मशानभूमीचा प्रश्न ऐरणीवर आला आहे
तारकर्ली ग्रामपंचायत व तारकर्ली ग्रामस्थांच्या सहयोगाने देवबाग वासियांना काही वर्षांपासून तारकर्ली स्मशानभूमीचा वापर करावा लागतो. पण एखादेवेळी तारकर्ली गावात तारकर्ली येथील मयत व्यक्तीचा दहन करण्याची वेळ आल्यास आणि त्याचवेळी देवबागमधील एखाद्या मयत व्यक्तीस दहन करावयाचे झाल्यास खूप अडचणीचा सामना करावा लागतो. तसेच तारकर्ली येथील स्मशानभूमीकडे जाण्यास पाच ते सहा की.मी.अंतराची पायपीटही करावी लागते.
अशीच घटना दिनांक २४ रोजी घडली . दोन्ही मयत व्यक्ती देवबाग गावचे असताना एका मयत व्यक्तीस दहन करण्यास तारकर्ली स्मशानभूमीत नेण्यात आले तर त्याचवेळी निवृत्त शिक्षिका श्रीमती चोपडेकर यांच्या पार्थिवला दहन करण्यासाठी देवबाग संगम येथे नेण्यात आले. यावेळी समुद्राची भरतीची वेळ असल्याने त्यांचा दहनविधी पाण्यातच उरकावा लागला. ग्रामस्थांनी सुध्दा आलेल्या प्रसंगाला सामोरे जाऊन दहनविधी उरकून घेतला. आतापर्यंतच्या इतिहासात कदाचित प्रथमच दहनविधी पाण्यात करावा लागला असेल. ह्यावेळी आजी माजी ग्रामपंचायत सदस्य, सरपंच,सभापती,जि.सदस्य उपस्थित होते.
वास्तविक देवबाग गावची स्मशानभूमी संगमाच्या येथे असल्याने समुद्राच्या लाटांच्या तडाख्याला तोंड देणारे पक्के बांधकाम असलेली आणि योग्य तंत्राने उभारणे आवश्यक आहे. परंतु संबंधित बांधकाम करताना कुणीही त्याचा परिपूर्ण अभ्यास करत नाहीत आणि कुणालाही या गोष्टीचे गांभीर्य नाही अशी तक्रार सदर ग्रामस्थ करत आहेत. गेले दहा ते बारा वर्षापासून ही समस्या असताना कोणालाही त्याची गंभीरता येत नसून एकंदरीत कार्यक्षमतेवर प्रश्न निर्माण होतो आहे. एकीकडे पर्यटनास नावारुपास येणाऱ्या देवबाग गावाला मानवाच्या मूलभूत गरजा मिळण्यासाठी कोणीच वाली नाही हे प्रकर्षाने जाणवते व स्पष्ट होते असे संतप्त ग्रामस्थांचे म्हणणे आहे.

