तुळशी वृंदावनाची साफसफाई व रंगरंगोटी सुरू

0
42

वेतोरे-वैभव गोगटे

दिवाळीनंतर तुळशी विवाहाचे वेध लागले आहेत 5 नोव्हेंबर पासून तुळशी विवाहाला प्रारंभ होत असून 8 नोव्हेंबर रोजी तुळशी विवाहाची समाप्ती असल्याने अंगणात लक्ष वेधून घेणारे तुळशी वृंदावनाची साफसफाई व रंगरंगोटी सुरू झाली आहे.

भारतीय संस्कृती ही मुळातच भावात्मकता प्रधान आहे . त्यामुळे तुळशीला हिंदू संस्कृतीत कन्येचे स्थान दिले जाते तुळशीची पूजा केल्याने मनोकामना पूर्ण होत असल्याचा समज असल्यामुळे पोटच्या कन्येला उत्तम वर मिळावा तिला सर्व सुख प्राप्त व्हावे यासाठी बहुतांश नागरिक आनंदाने हा उत्सव साजरा करतात. कार्तिकी एकादशी पासून पौर्णिमेपर्यंत कोणत्याही दिवशी सायंकाळी तुळशी विवाहाचे आयोजन करण्यात येते. मात्र बहुतांश नागरिक विवाहासाठी द्वादशीचा दिवस निवडतात तुळशी विवाह हे एक व्रत मानले गेले आहे हे व्रत केल्याने कर्त्याला कन्यादानाचे फळ मिळते असे मानले जाते.

तुळशी विवाहसाठी अंगणात आकर्षक वाटणाऱ्या तुळशी वृंदावन घडविण्यात अनेक कारागीर मग्न असल्याचे दिसून येत आहे. तर अंगणात लक्ष वेधून घेणाऱ्या तुलसी वृंदावनाची साफसफाई व रंगरंगोटी सुरू झाली आहे. विविध आकर्षक रंगाने वृंदावन मांडणी करण्यात येत आहे. विवाहा दिवशी सकाळी तुळशीला हळद चढवून सर्व सौभाग्य अलंकारांनी सजविले जाते व दुपारी महानैवेद्य दाखवून तुळशीत चींचा,आवळे ठेवले जातात. उसाचे वाण,दिंडा, बांबूच्या काठीने तुळशी वृंदावन सजविले जाते. तुळशी वृंदावनाच्या आजूबाजूला विविध प्रकारच्या रांगोळ्या, तसेच पणत्या लावल्या जातात. त्यानंतर सायंकाळी परंपरेनुसार पुरोहितांच्या मंत्रोच्चारात तुळस व बाळकृष्ण या दोघांमध्ये अंतरपाठ धरून मंगलाष्टका म्हणून त्यांचा विवाह लावला जातो. तद्नंतर घरातील सुवासिनी खण-नारळ सुपारीने तुळशीची ओटी भरतात. घरच्या कन्येस श्रीकृष्णासारखा आदर्श वर मिळावा असा यामधील हेतू आहे.

शनिवार दिनांक 5 नोव्हेंबर पासून तुळशी विवाह प्रारंभ होत असून ८ नोव्हेंबर पर्यंतच्या कालावधीत सर्वत्र तुळशी विवाहाचा सोहळा दिसून येणार आहे. तुळशी विवाह नंतर सर्वत्र शुभमंगल सावधानचा ध्वनी कानी पडण्यास सुरुवात होणार आहे. तुळशीला विष्णूप्रिया किंवा हरिप्रिया असेही संबोधले जाते. आपल्याला एखादी वस्तू देवाला अर्पण करावयाची असेल तर ती तुळशीच्या मुळापाशी अर्पण करतात. म्हणजे ती वस्तू इष्ट देवतेकडे पोहचते, अशी लोकमान्यता असल्याचे सांगितले जाते. तुळस अर्पण केल्याशिवाय केलेली विष्णूची पूजा व्यर्थ ठरते, असे पद्मपुराण सांगते. तुळशीची मंजिरी सर्व देवांची प्रतिनिधी मानली आहे. तुळस आरोग्यदृष्ट्याही अतिशय महत्त्वाची मानली गेली आहे.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here