Maharashtra: यंदा विवाह मुहूर्तांची रेलचेल; एकूण तब्बल ५८ मुहूर्त!

0
76

वेतोरे-वैभव गोगटे.-

– तुलशी विवाह पच्छात सनई चौघडा टुमटुमणार – साईचे तांदूळ हळदीत वलया…साईचे तांदूळ ….होकलेच्या आवशिक गे….मानान बोलया… होकलेच्या आवशिक गे….हळद चढवक बोलया….होकलेच्या बापाशीक गे…मानान बोलया.. – या ओव्यांच्या सुरांनी लग्न घरातील वातावरण मंगलमय व प्रसन्न होऊन जाते. तुळशी विवाह नंतर विवाह इच्छुक वधू-वरांच्या लगीनघाईला सुरुवात होणार आहे. तब्बल दोन वर्षानंतर या ओव्यांचे सूर वाडीवार ऐकायला मिळणार आहेत. 26 नोव्हेंबर पासून जून 2023 च्या 28 तारखेपर्यंत विवाहासाठी सुमारे ५८ बक्कळ मुहूर्त असल्याने दोनाचे चार हात करण्याची संधी मिळणार आहे.

गेली दोन वर्षे कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी अनेक निर्बंध होते. परिणामी सगळेच सण सोहळे ठप्प झाले होते. आता जन्माष्टमी पासून सर्वांनी मोकळा श्वास घेतला आहे. सण उत्सव नेहमीच्या उत्साहात साजरे होऊ लागले आहेत. दिपावली झाली. आता कार्तिकी एकादशी आणि त्यानंतर त्रिपुरारी पौर्णिमे पर्यंत तुळशी‌विवाहाची धामधूम रंगात येईल. तुळशी विवाह नंतर ग्रामीण भागात वधू-वरांच्या लग्नघटिका जवळ येऊ लागतील. 26 नोव्हेंबर पासून विवाह मुहूर्तांचा धुमधडाका सुरू होणार आहे. तुळशी विवाह नंतर ग्रामीण व शहरी भागात लग्नसरायची धावपळ दर वर्षी सुरु होत असते. वर आणि वधू साठी आवश्यक खरेदीला वेग येईल. लग्नाचा बस्ता बांधायची लगबग सुरू होईल. विवाह सोहळ्यानिमित्ताने लहान मोठ्या व्यवसायांना एक प्रकारचे सुगीचे दिवस येतात. मंगल कार्यालय, कापड दुकाने, सोन्या चांदीची दुकाने, किराणा व्यवसाय, भाजीपाला, आदी विविध व्यवसायाच्या दुकानात खरेदीची लगबग वाढून सगळीकडे उत्साहाचे वातावरण पसरते.

विवाह हा स्त्री व पुरुष यांच्या आयुष्यातील सर्वात महत्त्वाचा संस्कार मानला जातो या संस्कारानंतर स्त्री व पुरुष फक्त शारीरिकच नव्हे तर मानसिक, अध्यात्मिक दृष्टीने ही पुढील आयुष्यभर एकत्र राहणार असल्याने या संस्काराला मानवी आयुष्यात खूपच महत्त्व आहे.

विवाह संस्कार हा प्रत्येकाच्या आयुष्यातील एक अति महत्त्वाचा टप्पा असतो म्हणून बहुतांशी लोक घर बघावे बांधून लग्न पहावे करून असे वारंवार म्हटले जाते. वधू-वर पिता गरीब असो वा श्रीमंत आपल्या मुलाचे किंवा मुलीचे लग्न करताना प्रसंगी कर्ज काढूनही होईल तेवढी हौसमौज आणि थाट करण्याचा प्रत्येकाचा ओढा असतो. पूर्वीच्या काळात लग्न समारंभ म्हटल्यानंतर लग्न घरापासून संपूर्ण वाडीत लग्नाची धावपळ सुरू असायची. मात्र आता सध्याच्या काळात मनुष्यबळ उपलब्ध नसल्याने लग्न समारंभ मंगल कार्यालयात पार पडण्यात येतात. मंगल कार्यालयात एकापेक्षा अधिक मंगल विधी होत असल्याने कार्यालय निवडणे, डेकोरेटर, केटरिंग व्यवसाय, भटजी या सर्व मंडळींचे वेळापत्रक सांभाळून मुहूर्त निवडून विवाह निश्चित करण्यासाठी वधू-वर पक्षांची मोठी तारांबळ उडत असते. यंदा 26 नोव्हेंबर पासून 28 जून पर्यंत विवाहाचे मुहूर्त आहेत मे मध्ये सर्वाधिक 14 तर नोव्हेंबर मध्ये सर्वाधिक कमी ४ मुहूर्त आहेत याशिवाय वेगवेगळ्या पंचांगानुसार विवाह मुहूर्तही आहेत.तसेच यजमानांच्या सोयीनुसार पुरोहित काढीव मुहूर्त काढून देत असल्याने आणखी काही दिवस विवाह सोहळे रंगणार आहेत


विवाह मुहूर्त….

नोव्हेंबर– २६,२७,२८,२९
डिसेंबर- २,४,८,९,१४,१६,१७,१८,
जानेवारी २०२३- १८,२६,२७,३१
फेब्रुवारी-६,७,१०,११,१४,१६,२२,२३,२४,२७,२८
मार्च –८,९,१३,१७,१८
मे-२,३,४,७,९,१०,११,१२,१५,१६,२१,२२,२९,३०
जुन-१,३,७,८,११,१२,१३,१४,२३,२६,२७,२८

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here