वेंगुर्ला प्रतिनिधी- वेताळ प्रतिष्ठान सिंधुदुर्ग, तुळसच्यावतीने सलग नवव्या वर्षीअश्वमेध महोत्सवाअंतर्गत खुल्या व शालेय अशा दोन गटात खुल्या निबंध स्पर्धेचे आयोजन केले आहे.
आजच्या डिजिटल युगात प्रत्येक गोष्ट ऑनलाईन झाली आहे. दैनंदिन व्यवहारासह आर्थिक व्यवहार डिजिटल झाले, कार्यालयातील नोक-यांचे स्वरूप वर्क फ्रॉम होम झालं. यामुळे या वेगवान आणि क्षणाक्षणाला कात टाकणा-या जगात माणूस माणसात असूनही डिजिटलं झाला आहे, वास्तव दुनियेत वावरताना अगदी सहज होणारे संवाद आतां व्हाट्सअॅप, इन्स्टा, टेलिग्राम, स्नॅपचॅट आणि मेल या चॅटमध्ये बदलले आहेत. शब्द आणि डोळ्यातून व्यक्त होणारे भाव-भावनांची जागा निःशब्द इमोजीनी घेतली आहे. याच विषयावर व्यक्त होण्यासाठी ‘ईमोजीच्या या बोलघेवड्या युगात कोण ऐकेल माझ्या स्पंदनांची विराणी?‘‘ हा खुल्या गटासाठी निबंध लेखानाचा विषय आहे.
तसेच संस्कारक्षम पिढी घडविताना आई-वडिलांइतकचं घरातील आजी-आजोबांचा सहवास महत्वाचा असतो. परंतु सद्यस्थितीत विभक्त कुटुंबपद्धती, नोकरीनिमित्त कुटुंबासोबत पालकांच घरापासून दूरवर वास्तव्य, वृद्धाश्रम किवा आजच्या स्थितीला मुलाचे व्हिडीओ गेम किंवा मोबाईलचे अति आकर्षण अशा एक-ना-अनेक कारणांनी मुलांनाचा आजी-आजोबांशी होणारा संवाद, त्यांच्यातील सहवास कमी होताना दिसून येत आहे यासाठी मुलाच्या मानसिक आणि भावनिक विचाराचा वेध घेण्यासाठी ‘‘आमचे आजी-आजोबा हरवले आहेत‘‘ हा इयत्ता दहावीपर्यंत शालेय गटासाठी निबंध स्पर्धेचा विषय आहे.
स्पर्धेतील खुल्या गटास प्रथम, द्वितीय व तृतीय क्रमांकासाठी अनुक्रमे रोख रक्कम १०००, ७००, ५०० आणि शालेय गटास ७००, ५००, ३०० व प्रत्येकी चषक व प्रमाणपत्र आणि सहभागी सर्व स्पर्धकांना प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात येईल.
सहभागी स्पर्धकांनी निबंध कागदाच्या एका बाजूला स्वहस्ताक्षरात (खुला गटः किमान १०००शब्द, शालेय गटः किमान ५०० शब्द) लिहून वेताळ प्रतिष्ठान सिंधुदुर्ग, तुळस द्वारा- प्रा.सचिन वासुदेव परुळकर, मु.पो.तुळस, खरीवाडी, वेंगुर्ला (मोबा.९४२१२३८०५३) या पत्त्यावर २० डिसेंबर पर्यंत पाठवावा.
स्पर्धेविषयी अधिक माहितीसाठी गुरुदास तिरोडकर (९४२०७४७२६८) यांच्याशी संफ साधावा असे आवाहन प्रतिष्ठानचे अध्यक्ष विवेक तिरोडकर यांनी केले आहे.

