मुंबई- दहावी आणि बारावीतील विद्यार्थ्यांची परीक्षा फेब्रुवारी – मार्च पासून सुरु होणार आहे. परीक्षा बोर्डाने वेळापत्रक निश्चित केले असून दोन पेपरमध्ये एक दिवसाची सुटी दिली जाणार आहे.
कोरोनामुळे मागील वर्षी दहावी-बारावीची परीक्षा गावोगावच्या शाळा, महाविद्यालयात झाली. आता कोरोनाचा धोका टळल्याने विद्यार्थ्यांची परीक्षा पूर्वीच्या परीक्षा केंद्रांवर होणार आहे. कोरोनामुळे प्रात्यक्षिक परीक्षा देखील पारदर्शकपणे होऊ शकली नाही. निर्बंधांमुळे शाळा-महाविद्यालये बंद राहिल्याने अभ्यासक्रमात २५ टक्के कपात करण्यात आली होती. आता संपूर्ण अभ्यासक्रमावर (१०० टक्के) परीक्षा होईल, असे बोर्डाने स्पष्ट केले आहे.
परीक्षेचे अर्ज भरून झाले असून आता परीक्षेची तयारी युध्दपातळीवर सुरु झाली आहे. प्रश्नपत्रिका काढून त्याची छपाई करण्याचे काम हाती घेतले जाणार आहे. जागतिक स्पर्धेत विद्यार्थी टिकावेत, यादृष्टीने कोरोनानंतरच्या या परीक्षेतून विद्यार्थ्यांची बौध्दिक पातळी पडताळणी होईल. बारावीची परीक्षा २१ फेब्रवारीपासून तर दहावीची परीक्षा २ मार्चपासून सुरु होणार आहे. परीक्षेनंतर निकाल वेळेत जाहीर करून विद्यार्थ्यांचा पुढील प्रवेशाचा मार्ग मोकळा करून दिला जाणार आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका परीक्षांपूर्वी किंवा परीक्षेनंतर होतील, असेही सांगितले जात आहे.


