रत्नागिरी– जिल्हा रुग्णालयात नियुक्ती होऊनही वर्षभरापासून गैरहजर असलेल्या १५ डॉक्टरांच्या सेवासमाप्तीचा निर्णय घेण्यात आला आहे. तसा प्रस्ताव आमच्याकडे आला होता. यामुळे ही पदे रिक्त होऊन त्या जागी आरोग्य विभागाला नवीन पदे भरता येणार आहेत, अशी माहिती आरोग्य विभागाचे उपसंचालक प्रेमचंद कांबळे यांनी दिली. https://sindhudurgsamachar.in/sindhudurg-दोन-फूट-लांबीचा-एक-लोखंड/
आरोग्य विभागाचे उपसंचालक कांबळे यांनी नुकतीच रत्नागिरी जिल्हा रुग्णालयाची पाहणी केली. या वेळी त्यांनी स्वच्छतेवर अधिक भर देण्याच्या सूचना रुग्णालय प्रशासनाला दिल्या. विविध विभागातून त्यांनी फेरफटका मारला. ग्रामीण रुग्णालयांचा आढावा घेतला. या वेळी काही डॉक्टर वारंवार गैरहजर राहत असल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. यांची सेवा समाप्त न केल्यामुळे ही पदे भरलेली दिसतात. त्या जागेवर नवीन पदे भरता येत नाहीत म्हणून अनेक वर्षांपासून गैरहजर असलेल्या १५ वैद्यकीय अधिकाऱ्यांचीही सेवा लवकरच समाप्त करण्याचा धाडसी निर्णय त्यांनी घेतला आहे.
लवकरच त्यावर अंमलबजावणी होणार आहे. सेवा समाप्ती झाल्यानंतर ही पदे रिक्त होऊन त्या जागी नवीन पदे भरण्याची मुभा आरोग्य विभागाला मिळणार आहे. त्यामुळे जिल्हा रुग्णालयाला काही प्रमाणात नवीन वैद्यकीय अधिकारी मिळण्याची आशा पल्लवीत झाली आहे. रुग्णांची होणारी हेळसांड सहन केली जाणार नाही, असेही कांबळे यांनी स्पष्ट केले.


