Maharashtra: महाराष्ट्राची हिरकणी; वरवेलीची ८ वर्षीय सुकन्या गृहिता सचिन विचारे हिची आकाश भरारी

0
57
महाराष्ट्राची हिरकणी

मुंबई येथे वास्तव्य असलेली महाराष्ट्राची हिरकणी आणि गुहागर तालुक्यातील वरवेली गावची सुकन्या गृहिता सचिन विचारे (८वर्षे) हिने पुन्हा एकदा नवा विक्रम आपल्या नावावर कोरला आहे. त्यामुळे या आकाशाला गवसणी घालणाऱ्या हिरकणीच्या या विक्रमाची चर्चा रंगली आहे. तिच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. https://sindhudurgsamachar.in/maharashtra-बेलापूर-ते-गेटवे-ऑफ-इंडि/

२५० फूट उंचीचा सुळका
गृहिताने सह्याद्रीच्या दाट जंगलात ढाक किल्ल्याजवळ असलेल्या कळकराई या अतिशय दुर्गम, अत्यंत कठीण स्वरुपाच्या व २५० फुटांपेक्षा अधिक उंचीच्या ह्या सुळक्यावर चढाई आणि रॅपलिंग मोहीम २९ जानेवारी २०२३ ला यशस्वीपणे पूर्ण केली. नेहमी प्रमाणे ह्या वेळी सुद्धा गृहिता हिने ही मोहीम महाराष्ट्राचा पारंपारिक पेहराव असलेली नऊवारी साडी नेसून फत्ते केली. कळकराई सुळका सर करून गृहिताने सर्वात कमी वयात हा सुळका सर करण्याचा नवा विक्रम आपल्या नावावर नोंदला आहे.

९० अंशातील सरळ चढाई
कळकराई सुळक्यावर ९० अंशातील सरळ उभी आणि खुप कठीण प्रसंगी जीवावर बेतण्याची भीती असते अशी चढाई करावी लागते. कळकराई सुळका प्रस्तरारोहण हा कठीण आणि तांत्रिक श्रेणीत गणला जातो. हे शिखर चढण्यासाठी तांत्रिक कौशल्याची आवश्यकता असते. शिखरावर पोहोचण्यासाठी २००-२५० फूट तांत्रिक चढाई आणि उतरताना सुमारे २००-२५० फूट रॅपलिंग समाविष्ट असते ज्यासाठी सर्व गिर्यारोहण उपकरणे आणि प्रमाणित अनुभव आवश्यक असतात.

अडिज तासांची पायपीट
कळकराई पायथ्याशी पोहचण्यासाठी जांबीवली, कामशेत (धनगर वाडी) गावातून अडीच तासाची अतिशय दमछाक करणारी पायपीट करावी लागते. दुर्गम परिसर, उंच टेकड्या, घनदाट जंगल, निसरडी वाट दोन्ही बाजून खोल दरी, पाठीवर ओझे, यातून वाट काढावी लागते.

कळकराई सुळका सर करण्याचे स्वप्न उराशी बाळगून जिद्द चिकाटी आणि साहस याच्या जोरावर गृहिता (८ वर्षे) हीने जोरदार प्रयत्न केले. आणि यामध्ये तिला तीचे वडील सचिन विचारे व कल्याण येथील सुप्रसिद्ध सह्याद्री रॉक adventures टीमचे पवन घुगे, दर्शन देशमुख, रणजित भोसले, रसिका येवले, लतिकेश कदम, स्वप्नील भोईर, सुनील कणसे, अभिषेक गोरे यांची समर्थ साथ लाभली. त्यांच्या सोबत ही मोहीम तिने यशस्वी केली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here