Maharashtra: स्व. यशवंतराव चव्हाण राज्य वाड्मय पुरस्कार स्पर्धेसाठीच्या प्रवेशिका पाठविण्यास २ मार्च २०२३ पर्यंत मुदतवाढ

0
87
स्व. यशवंतराव चव्हाण राज्य वाड्मय पुरस्कार

मुंबई- राज्य शासनाच्या स्व. यशवंतराव चव्हाण राज्य वाड्मय पुरस्कार स्पर्धेसाठीच्या प्रवेशिका पाठविण्यास २ मार्च २०२३ पर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. तसेच या स्पर्धेच्या नियमावलीतील नियम क्रमांक २४ मध्ये बदल करण्यात आला असून या नियमात ‘महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळावरील शासन नियुक्त सदस्य वगळता इतरांना या पुरस्कारांसाठी पुस्तके सादर करता येतील’, अशी सुधारणा करण्यात आली आहे, अशी माहिती महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळाच्यावतीने करण्यात आले आहे. https://sindhudurgsamachar.in/sindhudurg-जिल्ह्यातील-ग्रामपंचा/

या पुरस्कार स्पर्धेसाठी प्रवेशिका व पुस्तके सादर करण्याच्या कालावधीस एक महिना अधिकची मुदतवाढ देण्यात आली असून आता या पुरस्कार स्पर्धेसाठी प्रवेशिका व पुस्तके स्वीकारण्याचा अंतिम दिनांक २ मार्च २०२३ असा आहे. मराठी भाषेतील उत्कृष्ट वाड्मय निर्मितीसाठी प्रकाशन वर्ष २०२२ करीता स्व. यशवंतराव चव्हाण राज्य वाड्मय पुरस्कार स्पर्धेसाठी जिल्हाधिकारी कार्यालय (मुंबई शहर व मुंबई उपनगर वगळून), महाराष्ट्र परिचय केंद्र, नवी दिल्ली व पणजी, गोवा येथे तसेच महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळाच्या कार्यालयात १ ते ३१ जानेवारी २०२३ पर्यंत पाठविता येणार होत्या.

२ फेब्रुवारी २०२३ रोजीच्या शासन निर्णयान्वये गतवर्षीच्या स्व. यशवंतराव चव्हाण राज्य वाड्मय पुरस्कार स्पर्धेच्या नियमावलीतील नियम क्रमांक २४ मध्ये बदल करण्यात आला असून या नियमात महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळावरील शासन नियुक्त सदस्य वगळता इतरांना या पुरस्कारांसाठी पुस्तके सादर करता येतील, अशी सुधारणा करण्यात आली आहे. या सुधारित नियमाची अंमलबजावणी सन २०२२ च्या स्व. यशवंतराव चव्हाण राज्य वाड्मय पुरस्कार स्पर्धेपासून करण्यात येत आहे. या योजनेची सन २०२२ च्या पुरस्कार स्पर्धेसाठीची सुधारित नियमावली व प्रवेशिका जिल्हाधिकारी कार्यालय (मुंबई शहर व मुंबई उपनगर वगळून), महाराष्ट्र परिचय केंद्र नवी दिल्ली व पणजी, गोवा येथे, महाराष्ट्र शासनाच्या www.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर व महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळाच्या http://sahitya.marathi.gov.in या संकेतस्थळावर व कार्यालयात उपलब्ध आहेत.

या योजने अंतर्गत पुढील साहित्य प्रकारांमध्ये पुरस्कार देण्यात येतात.

प्रौढ वाड्मय- 22 साहित्य प्रकार,बाल वाड्मय-6 साहित्य प्रकार, प्रथम प्रकाशन 6 साहित्य प्रकार, सरफोजीराजे भोसले बृहन्महाराष्ट्र पुरस्कार – सर्व साहित्य प्रकार

या स्पर्धेचे नियम खालील प्रमाणे आहेत. नियम सन 2022 च्या स्व. यशवंतराव चव्हाण राज्य वाड्मय पुरस्कार स्पर्धेसाठी पाठवावयाची पुस्तके दिनांक 1 जानेवारी 2022 ते दिनांक 31 डिसेंबर 2022 (दोन्ही दिवस धरून) या कालावधीत प्रकाशित झालेली व प्रत्यक्षात बाजारात उपलब्ध असलेली असावीत. या स्पर्धेसाठी प्रवेशिका व पुस्तके स्वीकारण्याचा सुधारित कालावधी दिनांक 1 जानेवारी 2022 ते 2 मार्च 2023 असा राहील. दिनांक 2 मार्च 2023 या विहित कालमर्यादेनंतर येणाऱ्या प्रवेशिका स्पर्धेसाठी स्वीकारल्या जाणार नाहीत. ही स्पर्धा महाराष्ट्रातील आणि महाराष्ट्राबाहेरील सर्व मराठी भाषिक लेखकांसाठी आणि प्रकाशकांसाठी खुली आहे. या स्पर्धेमध्ये भाग घेण्यासाठी कोणतेही स्पर्धा शुल्क नाही. या योजनेखालील स्पर्धेमध्ये ज्या लेखकांना एका विशिष्ट लेखन प्रकारामध्ये तीन वेळा पारितोषिके मिळाली असतील अशा लेखकांना त्याच लेखन प्रकारांमध्ये या स्पर्धेसाठी पुस्तक पुस्तके पाठविता येणार नाही. स्पर्धेच्या आवश्यक प्रवेशिका व माहितीपत्रक सचिव, महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ, मुंबई यांच्या कार्यालयात, तसेच मंडळाच्याhttps://sahitya.marathi.gov.in संकेतस्थळावर, महाराष्ट्र शासनाच्या www.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर तसेच राज्यातील सर्व (मुंबई शहर व मुंबई उपनगर हे दोन जिल्हे वगळून) जिल्हाधिकारी कार्यालयातही उपलब्ध होतील. मुंबई शहर व मुंबई उपनगर या दोन जिल्ह्यातील लेखक / प्रकाशकांनी पुस्तकाच्या दोन प्रतीसह विहित नमुन्यातील प्रवेशिका सचिव, महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ, रवींद्र नाट्य मंदिर इमारत, दुसरा मजला, पु.ल. देशपांडे महाराष्ट्र कला अकादमी आवार, सवानी मार्ग, प्रभादेवी, मुंबई 400025 येथे पाठवाव्यात. पुस्तकांची फक्त प्रथम आवृत्तीच स्पर्धेकरिता पात्र ठरेल. पुस्तकात प्रकाशन दिनांक, वर्ष, प्रथम आवृत्ती छापलेले असणे आवश्यक आहे. तारखेचा, वर्षाचा व आवृत्तीचा रबरी शिक्का अथवा चिकटवलेली पट्टी ग्राह्य धरण्यात येणार नाही. या स्पर्धेसाठी हस्तलिखित किवा टंकलिखित पुस्तकांचा विचार केला जाणार नाही. यापूर्वी राज्य किंवा साहित्य अकादमीचे पारितोषिक मिळालेल्या पुस्तकांमधील काही भागाचा समावेश एखाद्या पुस्तकात केला असल्यास, अशी पुस्तके स्पर्धेसाठी पात्र ठरणार नाहीत. साहित्य अकादमीचे पुरस्कार मिळालेल्या पुस्तकांचा या स्पर्धेसाठी विचार केला जाणार नाही. स्पर्धेसाठी दाखल करावयाच्या पुस्तकाचे लेखक एकापेक्षा अधिक असतील आणि या सर्व सहलेखकांपैकी एखादा लेखक जरी स्पर्धेच्या इतर नियमांप्रमाणे त्या लेखन प्रकारात भाग घेण्यास अपात्र ठरत असेल तर ते पुस्तक त्या लेखन प्रकारात भाग घेण्यास अपात्र समजण्यात येईल. दिवंगत लेखकाच्या पुस्तकाची प्रवेशिका या स्पर्धेसाठी अपात्र समजण्यात येईल. दिवंगत लेखकाच्या पुस्तकाची प्रवेशिका प्रकाशक, नातेवाईक वा इतर अन्य कुणालाही स्पर्धेसाठी सादर करता येणार नाही. तसे निदर्शनास आल्यास सदर प्रवेशिका व पुस्तक स्पर्धेसाठी अपात्र ठरवले जाईल. प्रवेशिकेमध्ये स्पर्धेसाठी पाठविण्यात येणाऱ्या पुस्तकाच्या वाड्मय प्रकाराचा व विभागाचा उल्लेख प्रवेशिकेमध्ये अचूकपणे नमूद करणे आवश्यक आहे. अन्यथा प्रवेशिकेवर वाड्- यम प्रकार व विभाग अचूकपणे नमूद करण्यात आला नसल्यास प्रवेशिका अपात्र समजण्यात येईल. एक पुस्तक फक्त एकाच विभागातील फक्त एकाच वाड्मय प्रकारात सादर करता येईल, ते एकापेक्षा अधिक विभागात व वाड्मय प्रकारात सादर करता येणार नाही. तसे निदर्शनास आल्यास ते पुस्तक सादर केलेल्या विभागातून व वाड्मय प्रकारातून बाद करण्यात येऊन स्पर्धेसाठी अपात्र समजण्यात येईल. अपूर्ण प्रवेशिका विचारात घेतल्या जाणार नाहीत. तसे निदर्शनास आल्यास त्या प्रवेशिका स्पर्धेसाठी अपात्र समजण्यात येतील. परीक्षण मंडळावर अथवा मंडळ सदस्यांवर दबाव येतो आहे, असे सिद्ध झाल्यास ज्या प्रवेशिकाबाबत हा दबाव येत असेल ती प्रवेशिका विचारात घेतली जाणार नाही. एखाद्या व्यक्तीचे पुस्तक दुसऱ्या व्यक्तिकडून शब्दांकित केले असल्यास असे शब्दांकित पुस्तक स्पर्धेसाठी सादर करता येणार नाही. तसे निदर्शनास आल्यास सदर पुस्तक स्पर्धेसाठी अपात्र समजण्यात येईल. या योजनेतील सरफोजीराजे भोसले बृहन्महाराष्ट्र पुरस्कार या विभागात फक्त महाराष्ट्राबाहेरील मराठी भाषिक लेखकालाच त्याचे पुस्तक स्पर्धेसाठी सादर करता येईल. महाराष्ट्रातील लेखकाला सरफोजीराजे भोसले बृहन्महाराष्ट्र पुरस्कार या विभागात त्यांचे पुस्तक स्पर्धेसाठी सादर करता येणार नाही तसे निदर्शनास आल्यास महाराष्ट्रातील सदर लेखकाचे पुस्तक स्पर्धेसाठी अपात्र समजण्यात येईल. या योजनेतील प्रथम प्रकाशन या विभागातील वाड्मय प्रकारात फक्त नवलेखकांनाच (नवलेखक म्हणजे ज्याचे आतापर्यंत एकही पुस्तक प्रकाशित झाले नाही, असा लेखक) त्यांचे पहिले पुस्तक स्पर्धेसाठी सादर करता येईल. नवलेखकांशिवाय अन्य लेखकांना, ज्यांची एकापेक्षा अधिक पुस्तके प्रकाशित झाली आहेत अशा लेखकांना प्रथम प्रकाशन विभागातील वाड्मय प्रकारात पुस्तक सादर करता येणार नाही. तसे निदर्शनास आल्यास सदर पुस्तक स्पर्धेसाठी अपात्र समजण्यात येईल. प्रथम प्रकाशन या विभागातील वाड्मय प्रकारात नवलेखकांना स्पर्धेसाठी पुस्तक सादर करताना प्रवेशिकेसोबतचे जोडपत्र 5 प्रमाणित करून प्रवेशिकेसोबत सादर करणे बंधनकारक राहील. जोडपत्र 5 प्रमाणित करून प्रवेशिकेसोबत सादर न केल्यास सदर प्रवेशिका व पुस्तक स्पर्धेसाठी अपात्र समजण्यात येईल. कोणत्याही विभागातील लेखन प्रकारांमध्ये अपेक्षित दर्जाचे पुस्तक न आढळल्यास कोणतेही पारितोषिक दिले जाणार नाही. याबाबतचा अंतिम निर्णय निवड समितीचा राहील. सदर स्पर्धेसाठी पुस्तक सादर करीत असलेल्या लेखकास (प्रथम प्रकाशन वगळून) यापूर्वी मिळालेल्या शासनाच्या राज्य वाड्मय पुरस्काराची स्वतंत्र यादी, तपशिलासह (पुस्तकाचे नाव, वाड्मय प्रकार, मिळालेला पुरस्कार व वर्ष इ.) लेखकांनी स्वतः स्वाक्षरीसह प्रमाणित करून प्रवेशिकेसोबत सादर करणे आवश्यक राहील. सदर स्पर्धेसाठी प्रवेशिका व पुस्तक हे पुरस्कार स्पर्धेच्या नियमावलीनुसार सादर करणे आवश्यक राहील. सदर पुरस्कार स्पर्धेसाठी प्राप्त होणाऱ्या सर्व प्रवेशिका व पुस्तके यांची तपासणी राज्य वाड्मय पुरस्कार छाननी समितीकडून केली जाईल. तपासणीअंती प्रवेशिका व पुस्तकाच्या पुरस्कार स्पर्धेसाठीच्या पात्र व अपात्रतेबाबत छाननी समितीकडून घेण्यात आलेला निर्णय हा अंतिम राहील.महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळावरील शासन नियुक्त सदस्य वगळता इतरांना उक्त पुरस्कारासाठी पुस्तके सादर करता येतील. ज्या लेखकांना, प्रकाशकांना या योजनेत भाग घ्यावयाचा असेल त्यांनी प्रत्येक प्रवेशिका प्रपत्रासोबत, आपल्या पुस्तकांच्या दोन प्रती पुढील नमुन्यातील अर्जासह संबंधित जिल्ह्याच्या जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत सचिव, महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ, रवींद्र नाट्य मंदिर इमारत, दुसरा मजला, पु.ल. देशपांडे महाराष्ट्र कला अकादमी आवार, सयानी मार्ग, प्रभादेवी, मुंबई 400025 यांच्याकडे पाठवाव्यात, स्पर्धेसाठी दिलेल्या पुस्तकाच्या प्रती स्पर्धकास नंतर परत करण्यात येणार नाहीत

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here