‘दयानंद वाणिज्य’ मध्ये स्व.मोहनलालजी बियाणी स्मृती व्याख्यानमालेला उत्स्फूर्त प्रतिसाद
लातूर : परीक्षेला सामोरे जाताना विद्यार्थ्यांनी चुकीच्या पद्धतीचा अवलंब न करता आपल्या ब्रेनचा पुरेपूर वापर करत वेळेचे नियोजन करून कुठल्याही प्रकारचा तणाव न घेता यश मिळवावे. त्यासाठी प्रथमता वेळेचे नियोजन, योग्य आहार, योग्य मार्गदर्शन व स्वतःमध्ये असलेली जिद्द हीच यश मिळवण्याची खरी गुरुकिल्ली आहे, असे प्रतिपादन राजर्षी शाहू महाविद्यालय लातूरचे प्रा.डॉ. प्रकाश रोडिया यांनी दयानंद वाणिज्य महाविद्यालय, लातूर आणि महाराष्ट्र राज्य पत्रकार संघ मुंबई यांच्या संयुक्त विद्यमाने स्वर्गीय मोहनलालजी बियाणी (काकाजी) यांच्या स्मृती प्रित्यर्थ आयोजित मासिक व्याख्यानमालेत “परीक्षेला सामोरे जाताना…आव्हाने आणि संघर्ष” विषयावर बोलताना केले. https://sindhudurgsamachar.in/sindhudurg-वेंगुर्ला-आयोजित-जिल्ह/
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्रभारी प्राचार्य डॉ.राजाराम पवार होते. याप्रसंगी मंचावर ज्येष्ठ नागरीक सत्यनारायणजी लड्डा, महाराष्ट्र राज्य पत्रकार संघ, मुंबईचे जिल्हाध्यक्ष डॉ. प्रभू गोरे, प्रसिद्धी विभाग प्रमुख प्रा.योगेश शर्मा उपस्थित होते. आपल्या व्याख्यानपर मार्गदर्शनात पुढे बोलताना डॉ. प्रकाश रोिडया म्हणाले, कोरोना जाऊन आता अनेक दिवस झाले, तरी आपण कोरोना सोबत घेऊन फिरत आहोत. विद्यार्थ्यांनी कुठल्याही प्रकारची भीती मनात न बाळगता ज्ञान मिळवण्यासाठी प्रयत्न केला पाहिजे, परीक्षेला न घाबरता पूर्ण तयारीनिशी परीक्षांना सामोरे जाणे गरजेचे आहे. परीक्षा आपल्यातील गुणांना सिद्ध करण्यासाठी असते. मनामध्ये कुठलीही शंका न ठेवता ध्येय ठेवून वाटचाल केल्यास यश आपल्या हातात आहे, याचा विद्यार्थ्यांनी विचार करावा. प्रास्ताविक महाविद्यालयाचे प्रसिद्धी विभागप्रमुख प्रा. योगेश शर्मा यांनी केले. यावेळी प्रास्ताविकातून विद्यार्थ्यांमध्ये कोरोना काळानंतर परीक्षेला सामोरे जाताना असलेला संभ्रम दूर करण्यासाठी कार्यक्रमाचे आयोजन केले असल्याची माहिती त्यांनी दिली. कोरोना काळानंतर विद्यार्थ्यांचे अभ्यास करण्याचे प्रमाण कमी झाल्याचे दिसून येत आहे, त्याचा परिणाम गुणवत्तेवर होत असल्याचे चित्र आज दिसत आहे. हे बदलण्यासाठी सर्वांनी प्रयत्न करण्याची गरज असून त्यात प्रमुख भूमिका स्वतः विद्यार्थ्यांची असणार आहे. आपली गुणवत्ता वाढवण्यासाठी महाविद्यालयात उपस्थित राहून आपल्या अडचणी सोडवून घेऊन विद्यार्थ्यांनी प्रयत्न करणे गरजेचे आहे, असे मत कार्यक्रमाचा अध्यक्षीय समारोप करताना महाविद्यालयाचे प्रभारी प्राचार्य डॉ.राजाराम पवार यांनी व्यक्त केले. तर सूत्रसंचालन प्रा. अक्षय पवार, पाहुण्यांचा परिचय प्रा.निखिल व्यास व आभार प्रदर्शन प्रा.अजय चव्हाण यांनी केले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी महाविद्यालयातील सर्व प्राध्यापक विद्यार्थी व सेवकांनी परिश्रम घेतले. कार्यक्रमासाठी विश्वास कुलकर्णी, संजय व्यापारी तसेच प्रा.डॉ. कविता बियाणी आदींसह प्राध्यापकांची व मोठ्या संख्येने विद्यार्थ्यांची उपस्थिती होती.
हार-तुरे देण्याऐवजी वृक्ष रोप देण्याची ‘दयानंद’ ची परंपरा
दयानंद वाणिज्य महाविद्यालयात आलेल्या पाहुण्यांना हार-तुरे देण्याऐवजी वृक्ष रोप देण्याची परंपरा आहे. हार-तुरे दिल्यानंतर ते केवळ फोटोत आणि देताना छान वाटतात. पण त्याचा उपयोग होत नाही. यामुळे आलेल्या प्रत्येक पाहुण्याला हार-तुरे, बुके देण्याऐवजी वृक्ष भेट देण्याची परंपरा दयानंद वाणिज्य महाविद्यालयाने सुरू केली आहे. या उपक्रमाचे सर्वच स्तरातून स्वागत होत आहे. व्याख्यान कार्यक्रमास आलेल्या सर्व प्रमुख पाहुण्यांना गुलाबाचे रोप भेट देण्यात आले.
विद्यार्थ्यांनी साकारलेल्या रांगोळीचे कौतुक
याप्रसंगी महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी एक लक्षणीय रांगोळी त्या ठिकाणी सभागृहाबाहेर काढली होती. अनेकांचे लक्ष या रांगोळीने याप्रसंगी वेधून घेतले होते. या रांगोळीचे पाहुण्यांनी कौतुक केले. रांगोळी काढणारे कलावंत विद्यार्थी वैष्णवी सगरे, वैष्णवी बनसोडे, ज्योती मिसाळ, तृप्ती साळुंखे, दरेकर बबीता, वैष्णवी शेंडगे, अभिषेक जाधव या विद्यार्थ्यांचा पाहुण्यांनी विशेष सत्कार केला.


