
: काव्यप्रेमी शिक्षक मंच सिंधुदुर्ग आणि दै. सिंधुदुर्ग समाचार आयोजित जागतिक महिलादिन विशेष राज्यस्तरीय काव्यलेखन स्पर्धा घेण्यात आली होती. या स्पर्धेला राज्यातून भरघोस प्रतिसाद मिळाला. स्पर्धेचा निकाल नुकताच ऑनलाईन पद्धतीने जाहीर करण्यात आला. स्पर्धेत एकूण 76 कवींनी सहभाग घेतला होता. प्रथितयश साहित्यिक अरुण इंगवले यांनी या स्पर्धेचे परिक्षण केले.
जागतिक महिलादिन विशेष राज्यस्तरीय काव्यलेखन स्पर्धेचा निकाल व सन्मानपत्र वितरण कार्यक्रमासाठी काव्यप्रेमी शिक्षक मंचचे राज्याध्यक्ष सन्माननीय आनंदजी घोडकेसर, राज्यसचिव सन्माननीय कालिदासजी चवडेकरसर, काव्यप्रेमी शिक्षक मंच सिंधुदुर्गचे प्रमुख मार्गदर्शक विजयजी जोशीसर,समूह प्रशासक बाबुजी घाडीगांवकरसर आणि दै. सिंधुदुर्ग समाचारच्या संपादक डाॅ. शर्मिला कदम उपस्थित होते.https://sindhudurgsamachar.in/ratnagiri-राजन-साळवी-यांच्या-कुटु/
या स्पर्धेत सहभागी झालेल्या कवितांना तीन निकष लावण्यात आले होते. हे निकष स्पर्धेत तसेच कविता रचणाऱ्यां कवींनी नेहमी लक्षात ठेवावेत असे साहित्यिक अरुण इंगवले यांनी सांगितले. यामध्ये अल्पाक्षर रमणीयता, स्वान्तसुखाय जी सगळ्यांना bhavel अशी,अनेकार्थता म्हणजेच कवितेत एक संदिग्धता असावी आणि म्हणूनच केशवसुतांच्या ‘ झपुर्झा ‘ चा अर्थ किंवा बालकवींच्या ‘ ‘परोपकंठी ‘ या शब्दाचा अर्थ आपण अजूनही लावतो आहोत असेही साहित्यिक अरुण इंगवले यांनी स्पर्धेचा निकाल जाहीर करताना मार्गदर्शनपर मनोगतात सांगितले.
या स्पर्धेत प्रथम क्रमांक प्रसाद बागवे यांनी पटकवला. द्वितिय क्रमांक रोहिणी कुलकर्णी यांना तर तृतिय क्रमांक संजय तांबे यांनी पटकावला. उत्तेजनार्थ क्रमांक मंदाकिनी सपकाळ, ऋतुजा सावंत भोसले, चारुशीला देऊलकर, अनुराधा दिक्षित, पूर्णिमा गावडे-मोरजकर, दुर्गा जोशी, मृण्मयी बांदेकर-पोकळे यांना मिळाला. या स्पर्धेच्या निमित्ताने खूप छान रचना वाचायला मिळाल्या. प्रत्येक कविता खूप सुंदर रचल्या होत्या. परीक्षकांनाही कविता निवडणे बरेच कठीण गेले.
प्रथितयश साहित्यिक अरुण इंगवले यांना ५ राज्यस्तरीय पुरस्कार, एकांकिका लेखनाचे ३ राज्यस्तरीय पुरस्कार, तिलारी बोलीतील कथांना दोन राज्यस्तरीय पुरस्कार, अरुण इंगवले याशिवाय १५ राज्यस्तरीय पुरस्कारांनी विभुषीत झाले आहेत. त्यांनी पुणे येथे झालेल्या संत साहित्य संमेलनाचे अध्यक्षपदही भूषविले आहे. सध्या ते रत्नागिरी जिल्ह्यातील तिलोरी बोलीवर संशोधन करत आहेत.
साहित्यिक अरुण इंगवले याप्रसंगी बोलताना , ‘आपण सर्व कवी सातत्यपूर्ण काव्यलेखन करत आहात हे महत्वाचे आहे . तसेच सातत्यपूर्ण लिखाणातूनच वरील सर्व गुण आपण आत्मसात कराल याची खात्री वाटते. आपणा सर्व सन्माननीय कवींचे पुन्हा एकदा मनापासून अभिनंदन करतो आणि पुढील काव्यलेखनासाठी शुभेच्छा देतो असे म्हणाले.
काव्यलेखन स्पर्धेचा निकाल व सन्मानपत्र वितरण कार्यक्रमासाठी मान्यवर कवींना देण्यात येणारी सन्मानपत्रे कु. सोहम घाडीगांवकर याने बनविली होती. या राज्यस्तरीय काव्यलेखन स्पर्धेचे व विजेत्या कवींचे अनेकांनी कौतुक व अभिनंदन केले आहे.

