मुंबई, पुणे आदी मोठय़ा शहरांमध्ये करोनाचा प्रादुर्भाव कमी होत असला तरी पश्चिम महाराष्ट्र, कोकण आणि मराठवाडय़ातील ग्रामीण भागांत मात्र या विषाणूचा विळखा वाढत आहे.
राज्यात सर्वाधिक मृतांची संख्या सध्या कोल्हापूर जिल्ह्य़ात असून, गेल्या आठवडय़ाच्या तुलनेत कोल्हापूरमध्ये ५३ टक्कय़ांनी मृत्यूसंख्येत वाढ झाल्याचे दिसते. एका आठवडय़ात कोल्हापूर ग्रामीणमध्ये ८४४ मृत्यू झाले आहेत. त्याखालोखाल बीड (२४ टक्के) सोलापूर (२० टक्के), सिंधुदुर्ग आणि रत्नागिरी (१६ टक्के), औरंगाबाद (१५टक्के) मृतांची संख्या वाढली आहे. राज्याच्या एकूण मृत्यूदरातही वाढ झाली असून हा दर १.५० टक्क्यांवरून १.५६ टक्कय़ांवर गेला आहे.
बाधितांचे प्रमाण साताऱ्यात सर्वाधिक : राज्यात बाधितांचे सर्वाधिक प्रमाण साताऱ्यात (३२ टक्के) आहे. त्याखालोखाल परभणी (२७ टक्के), उस्मानाबाद (२६ टक्के), रत्नागिरी (२२ टक्के), सिंधुदुर्ग (२४ टक्के), सांगली (२१ टक्के) आहे.