Maharashtra: संविधान कुणी बदलू शकत नाही, तुम्ही फक्त राज्यकर्ती जमात बनावे – इंजि. देगलूरकर

0
73
संविधान कुणी बदलू शकत नाही, तुम्ही फक्त राज्यकर्ती जमात बनावे - इंजि. देगलूरकर
संविधान कुणी बदलू शकत नाही, तुम्ही फक्त राज्यकर्ती जमात बनावे - इंजि. देगलूरकर

हदगाव (प्रतिनिधी) : रोज उठसूट संविधान बदलतो म्हणणाऱ्यांना खुशाल बोंबलू द्या, त्यामुळे कांही फरक पडणार नाही, डाॅ. बाबासाहेब आंबेडकरांनी आपणाला राज्यकर्ती जमात बनण्याचा संदेश दिला, त्यानुसार बहुजन समाजाला जागृत करुन तुम्ही फक्त राज्यकर्ती जमात बना असे आवाहन अखिल भारतीय गुरु रविदास समता परिषदेचे संस्थापक नेते इंजि. चंद्रप्रकाश देगलूरकर यांनी केले.

तळणी ता. हदगाव जि. नांदेड येथे डाॅ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३२ व्या सार्वजनिक जयंती महोत्सवात प्रमुख वक्ते म्हणून इंजि. चंद्रप्रकाश देगलूरकर बोलत होते. सुप्रसिद्ध विचारवंत प्रा. डाॅ. अनिल काळबांडे (उमरखेड) हे या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते. यावेळी प्रश्नमंजूषा, वक्तृत्व आणि नृत्य स्पर्धेतील विजेत्यांचा मान्यवरांच्या हस्ते बक्षीसे व पुस्तके देऊन भव्य सत्कार करण्यात आला.

आपल्या भाषणात इंजि. चंद्रप्रकाश देगलूरकर पुढे म्हणाले की, डाॅ. बाबासाहेब आंबेडकर यांनी जगातील सर्वात सुंदर असे संविधान भारताला दिले परंतु केवळ जातीय भावनेतून हे संविधान बदलण्याची भाषा बोलली जात आहे. हिंदू राष्ट्राचे त्यांचे दुसरे संविधान तयार झाले असल्याचे व केंद्रीय सत्तेच्या बळावर ते एके दिवशी भारताचे सध्याचे संविधान बदलतील असेही बोलले जात आहे, त्यांना ते खुशाल बोलू द्या, त्यामुळे कांहीही फरक पडणार नाही, संविधान बदलणे कपडे बदलण्याईतके सोपे नाही, तुम्ही फक्त बहुजन समाजाला जागृत करुन राज्यकर्ती जमात बनावे, मग देशात आपण डाॅ. आंबेडकरांचे मूळ संविधान पुन्हा जश्याला तसे लागू करु शकतोत.https://sindhudurgsamachar.in/maharashtra-देशात-जो-कायदा-आहे-जी-काय/

“जा आणि आपल्या घरांच्या भींतीवर लिहून ठेवा की आपणाला या देशाची राज्यकर्ती जमात बनायची आहे !” असा संदेश डाॅ. बाबासाहेब आंबेडकर यांनी आपणाला फार पूर्वी दिला पण आपण त्याकडे दुर्लक्ष केले. त्यानुसार संपूर्ण सत्ता ताब्यात घेण्याचा प्रयत्न न करता आपण युती आणि समझौते करुन सत्तेच्या एक दोन तुकड्यांवर आजवर समाधान मानत आलो आहोत. फक्त राखीव जागेवर आपल्याच माणसांच्या विरोधात लढत राहिलोत. या राखीव जागा रद्द झाल्या पाहिजेत, तिथे आजवर फक्त प्रस्थापितांचे गुलाम निवडून आले आहेत, हे गुलाम कधीही आमच्यासाठी धाऊन आले नाहीत, म्हणून आपली मते न विकता स्वाभिमानी माणसे निवडून सर्वोच्च सत्तेवर ताबा मिळविल्याशिवाय आपण संविधान बळकट करु शकणार नाही असेही सविस्तर मार्गदर्शन इंजि. देगलूरकर यांनी यावेळी केले.

 यावेळी कवी प्रशांत वंजारे (आर्णी), प्रा. डाॅ. अनिल काळबांडे, सदाशिव लोखंडे, सज्जन बर्डे (मुळावा) यांनीही सविस्तर मार्गदर्शन केले. मंचावर वसंता सोनटक्के, विशाल वाघमारे, शेरु सय्यद, खंडागळे महाराज, सोनाजी गायकवाड, शंकर पाटील, बाजीराव खडसे, सदाशिव कांबळे आदींची प्रमुख उपस्थिती होती.

सुहास लोखंडे यांनी या कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले. संचलन संघपाल पाईकराव यांनी केले तर शेवटी गौतम चवरे यांनी आभार मानले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी सुरेश लोखंडे, देवा लोखंडे, भीमराव ढोबळे, नारायण सोनटक्के, विजय लोखंडे आदींनी परिश्रम घेतले. सभेनंतर सप्त खंजेरीवादक संघपाल महाराज पवनूरकर यांचा रात्री उशिरापर्यंत समाज प्रबोधनाचा कार्यक्रम झाला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here