नांदेड (प्रतिनिधी) : प्राचिन भारताची बुद्ध हिच खरी ओळख आहे, बुद्धांच्या विज्ञानवादी विचारांमुळेच केवळ भारताची नाही तर जगाची खरी प्रगती झाली आहे, आणखी अधिक प्रगती व्हावी असे वाटत असेल तर बुद्धांच्या विचारांची शासन व्यवस्था जगात निर्माण झाली पाहिजे असे प्रतिपादन अखिल भारतीय गुरु रविदास समता परिषदेचे नेते इंजि. चंद्रप्रकाश देगलूरकर यांनी केले. https://sindhudurgsamachar.in/kokan-नागोठणे-येथे-सच्चिदानं/
बुद्ध विहार मैदान, मरळक ता. जि. नांदेड येथे बुद्ध जयंतीनिमित्त मरळक येथील महिला मंडळाच्या वतीने आयोजित समाज प्रबोधन शिबिरात प्रमुख मार्गदर्शक म्हणून इंजि. चंद्रप्रकाश देगलूरकर बोलत होते. स्थानिक कार्यकर्ते शंकर पोहरे यांनी यावेळी प्रास्ताविक केले. महिला मंडळाच्या वतीने राबविण्यात येत असलेल्या विविध उपक्रमांची माहिती त्यांनी दिली.
आपल्या प्रबोधनात इंजि. चंद्रप्रकाश देगलूरकर पुढे म्हणाले की, बुद्धांच्या विचाराने बिंबीसार, चंद्रगुप्त मौर्य, अशोक महान ई. राजांनी राज्य कारभार करुन भारताला प्रगतीच्या अत्यच्च शिखरावर नेऊन ठेवले होते. त्या नंतर आलेल्या आर्य, शक, हून, गुप्त यांनी विज्ञानवादी विचार पायदळी तुडऊन देशात अज्ञान व अंधश्रद्धा वाढविली. त्यानंतर जातीय विषमतेवर आधारित मनुस्मृती लागू करण्यात आली, यामुळे देशात अनाचार वाढत गेला.
सनातनी मनुस्मृतीची राखरांगोळी करुन डाॅ. बाबासाहेब आंबेडकर यांनी बुद्ध धम्माचे पुनरुज्जीवन केले. लौकिक अर्थाने भारत बुद्धमय केला. भारताला धर्मनिरपेक्ष असे चांगले संविधान दिले, ही ओळख मिटवून भारत हे हिंदूराष्ट्र किंवा रामराज्य घोषित करण्याचे षडयंत्र रचण्यात आले असून हे हाणून पाडायचे असेल तर बहुजन समाजाने संघटित होऊन शासनसत्ता आपल्या हातात घेणे जरुरीचे आहे, नसता पुन्हा एकदा गुलाम म्हणून जगण्याची तयारी ठेवा असा ईशारा शेवटी इंजि. चंद्रप्रकाश देगलूरकर यांनी दिला.
अखिल भारतीय गुरु रविदास समता परिषदेचे युवा जिल्हाध्यक्ष शिवराज कांबळे, कु. शिवानी जोगदंड यांचीही यावेळी प्रमुख उपस्थिती होती. खिरदानानंतर कार्यक्रमाची सांगता झाली. प्रत्येक पौर्णिमेला प्रबोधन शिबीर घेण्याचा निर्धार यावेळी व्यक्त करण्यात आला.


