Kokan: जि.प.पू.प्रा.आदर्श मराठी शाळा चंद्रनगर या शाळेतील विद्यार्थिनीने बनवली चांद्रयान-3 ची हुबेहुब प्रतिकृती

0
295
कु.शमिका नयनेश मुलूख हिने चांद्रयान-3 ची हुबेहुब प्रतिकृती तयार केली
कु.शमिका नयनेश मुलूख हिने चांद्रयान-3 ची हुबेहुब प्रतिकृती तयार केली

दापोली– इसरो या भारतीय अवकाश संशोधन संस्थेने नुकतेच चांद्रयान-3 चे यशस्वी प्रक्षेपण केले. येत्या काही दिवसांत हे चांद्रयान चंद्राच्या कक्षेत प्रवेश करणार आहे. तमाम भारतीयांसाठी अभिमानाचा क्षण असलेल्या या प्रक्षेपण कार्यक्रमाचे संपूर्ण जगभरासाठी थेट प्रक्षेपणही करण्यात आले होते. भारतातील कोट्यवधी जनतेने या थेट प्रक्षेपणाचा अनुभव घेतला. भारतातील सर्व शाळा व महाविद्यालयांतून सर्व विद्यार्थ्यांनी या थेट प्रक्षेपणाचा ‘ याचि डोळा ‘ आस्वाद घेतला. https://sindhudurgsamachar.in/kokan-संत-राऊळ-महाराज-महाविद्य/

दापोली तालुक्यातील जिल्हा परिषद पूर्ण प्राथमिक आदर्श मराठी शाळा चंद्रनगर या शाळेतील सर्व विद्यार्थ्यांनी दूरचित्रवाणीवरील थेट प्रक्षेपणातून या कार्यक्रमाचा प्रत्यक्ष अनुभव घेतला होता. शाळेच्या मुख्याध्यापिका अर्चना सावंत, विषय शिक्षक बाबू घाडीगांवकर, मानसी सावंत, मनोज वेदक या शिक्षकांनीही चांद्रयान-3, त्याची माहिती, उद्देश, इसरो या संस्थेच्या कार्याची माहिती सर्व विद्यार्थ्यांना करून दिली. इसरो या भारतीय अवकाश संशोधन संस्थेच्या कार्यातून प्रेरणा घेत या शाळेतील इयत्ता सातवीतील विद्यार्थिनी कु. शमिका नयनेश मुलूख हिने आपत्कालीन अतिवृष्टी सुट्टीच्या तीन दिवसांच्या कालावधीत घरीच चांद्रयान-3 ची अगदी हुबेहुब प्रतिकृती तयार केली आहे.

कागद, पुठ्ठा, गोंद, स्केचपेन, कात्री आदी उपलब्ध साहित्याचा वापर करून तिने ही प्रतिकृती बनविली आहे. विषय शिक्षक बाबू घाडीगांवकर यांच्या मार्गदर्शनाखाली तिने ही सुंदर प्रतिकृती बनविली. आपत्कालीन सुट्टीनंतर सोमवारी शाळेत आल्यावर तिने ही प्रतिकृती वर्गशिक्षक बाबू घाडीगांवकर यांचेकडे सुपूर्द केली. मुख्याध्यापिका अर्चना सावंत यांनीही शमिका मुलूख हिचे कौतुक केले. विज्ञान विषय, तंत्रज्ञान, मूलभूत संकल्पना, संशोधन व प्रयोगांबाबत विद्यार्थ्यांमध्ये आवड निर्माण होण्यासाठी अशी स्वयंनिर्मिती इतर विद्यार्थ्यांसाठी प्रेरणादायी असल्याचे मत शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष रुपेश बैकर यांनी व्यक्त केले. शमिका मुलूख हिने बनविलेल्या चांद्रयान-3 या प्रतिकृतीचे सर्वांनीच कौतुक केले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here