खेड (प्रतिनिधी) : रोजगाराची समस्या अत्यंत गंभीर झालेली असताना नोकरीसाठी बेरोजगार अनेक ठिकाणी उंबरठे झिजवत आहेत. त्यांच्या या समस्येचा गैरफायदा घेत नोकरीचे आमिष दाखवत याआधी रोख पैसे स्वीकारून फसवणूक होत असे आता मात्र ऑनलाईन फसवणुकीचे प्रकार वाढले आहे. ऑनलाईन फसवणुकीचा असाच प्रकार भरणे खेड येथे घडला असून त्यामुळे खळबळ उडाली आहे. अर्धवेळ व पूर्णवेळ नोकरी मिळवून देतो, असे प्रलोभन दहवून भरणे- जाधववाडी येथील विशाल महिपत कुंभार या तरुणाला अज्ञाताने तब्बल ४लख १७ हजार रुपयांना ऑनलाईन गंडा घातला आहे. ३० जुलै ते २ ऑगस्ट या कालावधीत घडलेल्या या फसवणूक प्रकरणी पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत सविस्तर वृत्त असे की, एका अज्ञात व्यक्तीने विशाल याच्या मोबाईलवर संपर्क साधला. त्याला अर्धवेळ व पूर्णवळ नोकरीचे देण्याचे प्रलोभन दाखविले. तसा मोबाईल संदेश पाठवून
काही टास्क करण्यास सांगितले. टास्क पूर्ण केल्यावर चांगले कमिशन मिळेल, असेही प्रलोभन दाखविले. प्रथम त्या टास्कमध्ये पैसे गुंतवण्यास सांगितले. त्यानुसार त्याने अज्ञात व्यक्तीच्या बँक खात्यावर यु.पी.आय. आयडी व यु.टी.आर.द्वारे काही टप्यात ४ लाख १७ हजार १७२ रुपये जमा करून घेतले. यानंतर विशाल कुंभार यास कुठल्याही प्रकारचे कमिशन दिले नाही. फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर तत्काळ पोलीस स्थानक गाठत तक्रार नोंदवली. या तक्रारीनुसार अज्ञातावर भामट्याच्या विरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल झाला आहे.


