समाजसेवा, उत्साह आणि आनंदाचा संगम — ‘शिक्षित मिशन सिंधू’चा अभिनव उपक्रम
देवगड : देवगड येथील नारिंग्रे गावामध्ये रक्तदानासारख्या जीवनदायी कार्याला नवे रूप देत ‘शिक्षित मिशन सिंधू’ संस्थेने एक आगळावेगळा प्रयोग राबवला. संस्थेच्या रक्तदान शिबिरात सहभागी झालेल्या प्रत्येक रक्तदात्याला ‘सेल्फी पॉईंट’वर फोटो काढण्याची खास संधी देण्यात आली. रक्तदानानंतर समाधान, अभिमान आणि आनंदाने उजळलेल्या चेहऱ्यांसह हे सेल्फी पॉईंट प्रेरणादायी ठरले.
या उपक्रमाने शिबिराचे वातावरणच बदलले. रक्तदात्यांनी आपले क्षण टिपत सोशल मीडियावर “रक्तदान म्हणजे अभिमान” असा संदेश दिला. ही कल्पना सोशल मीडियावर व्हायरल झाली असून अनेकांनी संस्थेच्या प्रयत्नांचे कौतुक केले.
‘मिशन सिंधू’चे कार्यकर्ते सांगतात, “दरवर्षी आम्ही रक्तदान शिबिर घेतो, पण या वेळेस तरुणांना आकर्षित करण्यासाठी वेगळं काहीतरी करण्याचा विचार केला आणि त्यातून ‘सेल्फी पॉईंट’ ही कल्पना साकारली.”
या शिबिरात तब्बल १५१ रक्तदात्यांनी सहभाग घेतला. डिसेंबर महिन्यात होणाऱ्या पुढील शिबिरासाठी ‘मिशन रक्तसिंधू ८’ ही नवी संकल्पना जाहीर करण्यात आली आहे. त्यासाठी नोंदणी ऑनलाइन सुरू असून सर्व माहिती संस्थेच्या अधिकृत सोशल मीडिया पेजवर उपलब्ध आहे.
संस्थेच्या या कल्पक उपक्रमामुळे रक्तदानाबद्दलची जनजागृती वाढली असून तरुणांमध्ये सामाजिक जबाबदारीची भावना अधिक दृढ झाली आहे. रक्तदानाला उत्सवाचे रूप देणारा हा उपक्रम समाजासाठी प्रेरणादायी ठरत आहे.

