चराठे येथे राष्ट्रप्रेम, शिस्त आणि नेतृत्वगुणांचे संगमस्थान उभे राहणार
सावंतवाडी :
कोकणातील विद्यार्थ्यांसाठी अभिमानाची बातमी! संरक्षण मंत्रालय, भारत सरकार आणि सैनिक स्कूल सोसायटी, नवी दिल्ली यांच्या मान्यतेने ‘भोसले सैनिक स्कूल’ आता अधिकृतपणे स्थापन होत आहे. श्री. यशवंतराव भोसले एज्युकेशन सोसायटीच्या माध्यमातून हे विद्यालय चराठे येथील भोसले नॉलेज सिटी परिसरात उभारले जात असून, हे कोकणातील पहिले सैनिक स्कूल ठरणार आहे.
संस्थेचे कार्याध्यक्ष अच्युत सावंत-भोसले यांनी आयोजित पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. यावेळी लेफ्टनंट कर्नल रत्नेश सिन्हा (CEO) आणि जनसंपर्क अधिकारी नितीन सांडये उपस्थित होते.
सध्या देशभरात ३३ सैनिक स्कूल्स कार्यरत असून केंद्र सरकारने आणखी ६९ नव्या शाळांना मान्यता दिली आहे. या शाळा Public Private Partnership (PPP) मॉडेलवर चालवल्या जाणार असून देशभरात सुमारे १२,००० विद्यार्थ्यांसाठी प्रवेश क्षमता निर्माण होईल.
दरवर्षी देशभरातून सुमारे दीड लाख विद्यार्थी All India Sainik School Entrance Examination (AISSEE) देतात, मात्र मर्यादित जागांमुळे प्रवेश अत्यंत स्पर्धात्मक ठरतो. त्यामुळे कोकणातील या नवीन शाळेमुळे स्थानिक विद्यार्थ्यांना मोठी संधी उपलब्ध होणार आहे.
🌟 सहशिक्षणात्मक सैनिक स्कूल — महिला सबलीकरणाचं नवं पर्व
भोसले सैनिक स्कूलमध्ये दरवर्षी इयत्ता सहावी आणि नववी मध्ये प्रवेश घेतला जाईल. एकूण १६० विद्यार्थ्यांची क्षमता असून त्यापैकी ४० जागा विद्यार्थिनींसाठी राखीव ठेवण्यात आल्या आहेत. त्यामुळे हे शाळा कोकणातील पहिलं सहशिक्षणात्मक सैनिक स्कूल ठरणार आहे. मुलींनाही सैनिकी प्रशिक्षण, शारीरिक तंदुरुस्ती आणि नेतृत्त्वगुण विकसित करण्याची संधी मिळेल.
🏫 अत्याधुनिक कॅम्पस आणि सर्वांगीण शिक्षण
या शाळेचा परिसर आधुनिक सुविधांनी सज्ज करण्यात येत आहे. शैक्षणिक इमारती, ट्रेनिंग ब्लॉक्स, हॉस्टेल्स, ड्रिल ग्राउंड आणि क्रीडा संकुल उभारण्यात येत आहे. विद्यार्थ्यांना शिस्त, आत्मविश्वास, स्वावलंबन, देशभक्ती आणि सामाजिक जबाबदारीचे शिक्षण देत भविष्यातील सैन्य अधिकारी आणि जबाबदार नागरिक घडविणे हे संस्थेचे उद्दिष्ट आहे.
📅 उद्घाटन आणि प्रवेश प्रक्रिया
शाळेच्या भूमिपूजन आणि उद्घाटनाचा सोहळा शनिवार, १५ नोव्हेंबर रोजी होणार आहे. त्यानंतर औपचारिक प्रवेश प्रक्रिया सुरू होईल. दरम्यान, AISSEE परीक्षा अर्जाची शेवटची तारीख ९ नोव्हेंबर असल्याची माहितीही देण्यात आली.
ले. कर्नल रत्नेश सिन्हा म्हणाले,
“भोसले सैनिक स्कूल हे केवळ शैक्षणिक केंद्र नसून, कोकणातून भविष्यातील सैन्य अधिकारी आणि जबाबदार नागरिक घडविण्याचं ध्येयस्थान ठरेल.”
श्री. यशवंतराव भोसले एज्युकेशन सोसायटीने या शाळेद्वारे कोकण आणि महाराष्ट्राच्या शैक्षणिक इतिहासात एक नवं सुवर्णपान लिहिलं, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

