अलिबाग प्रतिनिधी
कोकण व पश्चिम महाराष्ट्राला जोडणारा एक नवा प्रवासी मार्ग सुरू होत असून, प्रवाशांसाठी ही आनंदाची बातमी ठरली आहे. महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या कोल्हापूर विभागातील कुरुंदवाड आगारातून कुरुंदवाड-अलिबाग अशी नवी एसटी बस सेवा सुरू करण्यात आली आहे. या मार्गामुळे कोकण आणि सांगली जिल्ह्यातील प्रवाशांना प्रवासाची मोठी सोय उपलब्ध होणार आहे.
नवीन बससेवेचा शुभारंभ लवकरच होणार असून, बसचा प्रकार साधी लालपरी असा आहे. ही बस दररोज कुरुंदवाड वरून सकाळी 8:30 वाजता तर अलिबाग वरून सकाळी 5:30 वाजता सुटणार आहे. या बससाठी आरक्षणाची सुविधा देखील उपलब्ध करून देण्यात आली आहे.
या नव्या मार्गावर अलिबाग, पिंपळभाट, कार्लेखिंड, पेझारी, पोयनाड, वडखळ, पेण, खोपोली, लोणावळा, कार्ल, तळेगाव फाटा, देहूरोड, निगडी, चिंचवड, वल्लभनगर, वाकडेवाडी, स्वारगेट, सातारा, कराड, ईश्वरपूर, सांगली, जयसिंगपूर, शिरोळ, नरसोबाची वाडी अशी प्रमुख ठिकाणे येणार आहेत. त्यामुळे या मार्गावरून प्रवास करणाऱ्या प्रवाशांना मोठी सोय होणार असून, पर्यटन, नोकरी, शिक्षण आणि व्यापारी कामांसाठी ये-जा करणाऱ्यांसाठी ही बस अत्यंत उपयुक्त ठरणार आहे.
तिकीट दराच्या बाबतीतही एसटी प्रशासनाने परवडणारी रचना केली आहे.
▪️ प्रौढ व्यक्तींसाठी भाडे ₹710,
▪️ लहान मुलांसाठी ₹355,
▪️ तर महिला सन्मान योजनेअंतर्गत महिला प्रवाशांना ₹355 इतके भाडे लागू होणार आहे.
या बसमध्ये पुशबॅक सीट्स तसेच मोबाइलसाठी चार्जिंग पॉईंट ची सुविधा उपलब्ध आहे. प्रवाशांना प्रवासादरम्यान आरामदायी अनुभव मिळावा यासाठी एसटी प्रशासनाने विशेष काळजी घेतली आहे.
महामंडळाच्या माहितीनुसार, या मार्गावर एसटीच्या सर्व प्रकारच्या सवलती लागू राहतील. त्यामुळे विद्यार्थी, ज्येष्ठ नागरिक, दिव्यांग आणि इतर सवलती पात्र प्रवासी यांना देखील या सेवेचा लाभ घेता येणार आहे.
एसटी विभागाने ही सेवा सुरू करण्यामागे उद्देश हा की, कोकणातील प्रमुख पर्यटनस्थळ अलिबाग आणि पश्चिम महाराष्ट्रातील व्यापारी व सांस्कृतिक केंद्र कुरुंदवाड यांना थेट जोडणे. त्यामुळे दोन्ही प्रदेशांमधील सामाजिक, व्यावसायिक आणि पर्यटनात्मक देवाणघेवाण अधिक सुलभ होईल.
या नव्या सेवेबाबत स्थानिक प्रवाशांनी समाधान व्यक्त केले असून, “अलिबागहून सांगली, जयसिंगपूरकडे जाण्यासाठी पूर्वी प्रवासाला खूप वेळ लागत असे. आता थेट एसटी मिळणार असल्याने वेळ वाचेल आणि प्रवास अधिक सोयीस्कर होईल,” अशी प्रतिक्रिया प्रवाशांनी दिली आहे.
राज्य परिवहन महामंडळाचे अधिकारी सांगतात की, “या नव्या मार्गाला चांगला प्रतिसाद मिळेल, असा आम्हाला विश्वास आहे. प्रवाशांच्या अभिप्रायावरून या मार्गावरील सेवेत आणखी सुधारणा करण्यात येतील.”
या नव्या एसटी सेवेच्या शुभारंभामुळे अलिबाग आणि पश्चिम महाराष्ट्रातील प्रवाशांसाठी प्रवासाची नवी सोय उपलब्ध झाली असून, पर्यटन आणि व्यापार या दोन्ही क्षेत्रांना त्याचा सकारात्मक परिणाम होणार आहे.
महाडीबीटीवरील पावणेदोन लाख अर्ज पोकराकडे वर्ग करण्याचा निर्णय|
राज्यातील शेतकऱ्यांना विविध कृषी योजनांमधून जलद अनुदान मिळण्यासाठी ‘महाडीबीटी’वरील पावणेदोन लाख अर्ज आता ‘पोकरा’कडे वर्ग करण्यात आले आहेत. नानाजी देशमुख कृषी संजीवनी (पोकरा) प्रकल्पाचा दुसऱ्या टप्प्यात सहा वर्षांत सहा हजार कोटींचे अनुदान वाटले जाणार आहे.


