अवघ्या 5 दिवसांत सुपर रँडोनिअर बनले सावर्डेचे पृथ्वी कृष्णकांत पाटील !

0
17


विश्वनाथ पंडित (कोकण व पश्चिम महाराष्ट्रातील पहिला पाच दिवसीय सुपर रँडोनिअर सायकलपटू! )

चिपळूण:  ऑडेक्स इंडिया रँडोनिअर्स संलग्न सह्याद्री रँडोनिअर्स, चिपळूण यांच्या वतीने आयोजित पाच दिवसीय सुपर रँडोनिअर सिरीज मध्ये सहभागी होत सावर्डे (ता. चिपळूण) येथील पृथ्वी कृष्णकांत पाटील याने अवघ्या पाच दिवसांत सुपर रँडोनिअर होण्याचा पराक्रम केला आहे. हा किताब मिळविणारा पृथ्वी पाटील हा संपूर्ण कोकण व पश्चिम महाराष्ट्रातील पहिला सायकलपटू ठरला आहे.

ऑडेक्स इंडिया रँडोनिअर्सच्या अंतर्गत भारतातील विविध क्लब बीआरएम (Brevets de Randonneurs Mondiaux) या सायकल क्रीडाप्रकाराचे आयोजन करतात.या अंतर्गत 200, 300, 400 आणि 600 किमी अंतर सायकल चालविण्यासाठी अनुक्रमे 13.5, 20, 27 आणि 40 तासांची मर्यादित मुदत दिली जाते.

या सर्व राईड्स पूर्णपणे सेल्फ सपोर्टेड असतात. सामान्यतः जानेवारी ते डिसेंबर या कालावधीत चारही बीआरएम पूर्ण केल्यानंतर रायडरला सुपर रँडोनिअर किताब दिला जातो. मात्र या प्रकारातील आव्हानात्मकता वाढविण्यासाठी सह्याद्री रँडोनिअर्सने सलग पाच दिवसांतच सर्व बीआरएम आयोजित केल्या होत्या! अशा कठीण परिस्थितीत शारीरिक ताकदीपेक्षा मानसिक स्थैर्याचा कस लागतो. केवळ पाच दिवसांत 1500 किमी सायकल चालवत पृथ्वीने हा पराक्रम साधला आहे. या यशानंतर समाजाच्या सर्व थरातून त्याच्यावर कौतुकाचा वर्षाव होत आहे. चि. पृथ्वी हा सावर्डे येथील डॉ. कृष्णकांत पाटील व डॉ. सौ. दर्शना पाटील यांचा सुपुत्र असून तो एमबीबीएस प्रथम वर्षाचा विद्यार्थी असून चिपळूण सायकलिंग क्लबचा सक्रिय सदस्य आहे. चिपळूण येथे आगमन झाल्यानंतर चिपळूण सायकलिंग क्लबच्या सदस्यांनी फटाक्यांची आतषबाजी करुन आनंद व्यक्त केला. आपल्या या यशाबद्दल बोलताना पृथ्वी म्हणाला “चिपळूण सायकलिंग क्लबच्या सर्व सदस्यांच्या सहकार्यामुळेच हे यश शक्य झाले.” सह्याद्री रँडोनिअर्स क्लबनेकराड–सोलापूर, कराड–नागज, कराड–बारामती–इंदापूर तसेच कराड–फलटण या मार्गांवर या बीआरएम आयोजित केल्या होत्या. सायकलपटूंची सुरक्षितता, त्यांचा आहार, तब्येत आणि मनोबल याकडे विशेष लक्ष दिल्याबद्दल पृथ्वीने सह्याद्री रँडोनिअर्सचे सर्वेसर्वा श्री. मनोज भाटवडेकर यांचे आभार मानले. या अद्वितीय यशानंतर चिपळूण-संगमेश्वर विधानसभा क्षेत्राचे आमदार मा. श्री. शेखर निकम सर यांनी कराड येथे पृथ्वीचा विशेष सन्मान केला

“आव्हान पेलणारा, मर्यादा मोडणारा आणि कोकणाचा अभिमान – SR पृथ्वी कृष्णकांत पाटील यांच्या यशाबद्दल त्याचे सर्वत्र  कौतुक होत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here