बांदा : सिंधुदुर्ग स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या (एलसीबी) पथकाने रविवारी पहाटे बांदा परिसरात विनापरवाना गोवा दारू वाहतूक करणाऱ्या दोघांना रंगेहात पकडले. या कारवाईत तब्बल 12 लाख 11 हजार 200 रुपयांचा मुद्देमाल, त्यात 2 लाख 11 हजार रुपयांची गोवा दारू आणि 10 लाखांची कार असा साठा जप्त करण्यात आला आहे.
ही धाडसी कारवाई रविवारी पहाटे साडेतीनच्या सुमारास बांदा येथील हॉटेल कावेरीजवळ करण्यात आली. पोलिसांनी गोवा ते सांगली दिशेने येणाऱ्या एका कारची तपासणी केली असता, त्यात विविध ब्रँडच्या गोवा दारूच्या बाटल्यांचे बॉक्स आढळले.
या प्रकरणी आकाश नामदेव खोत (वय 25, रा. सलगरे, जि. सांगली) आणि विठ्ठल पांडुरंग नाईक (वय 48, रा. विश्रामबाग, जि. सांगली) या दोघांना अटक करण्यात आली आहे. त्यांनी ही दारू सांगलीकडे विक्रीसाठी नेत असल्याची प्राथमिक माहिती पोलिसांना मिळाली आहे.
दारू तस्करीवर लगाम घालण्यासाठी एलसीबीकडून पुढील तपास सुरू आहे.

