अलिबाग: अलिबागमध्ये येथील सोयरिक, संघटना आणि राजकीय प्रतिष्ठेचा संघर्ष पुन्हा एकदा रंगताना दिसतो आहे.आता प्रश्न उभा ठाकलाय – नातं टिकणार की राजकारण जिंकणार
अलिबाग नगरपरिषद नेहमीच केंद्रस्थानी राहिली आहे. निवडणुकीची घोषणा होताच प्रत्येक पक्षाने आपापली रणनीती आखायला सुरुवात केली आहे. मात्र, सर्वाधिक उत्सुकता आहे ती शेतकरी कामगार पक्ष (शेकाप) नगरपरिषदेच्या अध्यक्षपदासाठी कोणत्या महिला नेत्यावर विश्वास ठेवतो याची. यंदा हे पद सर्वसाधारण महिला प्रवर्गासाठी राखीव असल्याने शेकापसमोर पात्र, जनमान्य आणि प्रभावी उमेदवार निवडण्याचे कठीण आव्हान आहे. पक्षाच्या दीर्घ परंपरा आणि अलिबागमधील प्रभाव लक्षात घेतल्यास हा निर्णय पक्षासाठी निर्णायक ठरणार आहे. शेकापमध्ये मानसी म्हात्रे यांना अनुभवी आणि संघटनात्मक दृष्ट्या सक्षम कार्यकर्त्या म्हणून ओळख मिळते, तर अक्षया नाईक या तरुण, गुणवान आणि नव्या पिढीचे प्रतिनिधित्व करणाऱ्या उमेदवार आहेत. अक्षया यांच्या पाठीशी माजी नगराध्यक्ष प्रशांत नाईक यांचा अनुभव आणि संपर्काचे जाळे आहे. तसेच माजी आमदार जयंत पाटील यांच्या पत्नी व माजी नगरसेवक प्रशांत नाईक यांच्या भगिनी सुप्रिया पाटील यांचे नावही चर्चेत आहे.दुसरीकडे, विरोधकांनीदेखील आपली मोर्चेबांधणी सुरू केली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसकडून प्रवीण ठाकूर यांच्या पत्नी कविता ठाकूर, काँग्रेसकडून श्रद्धा ठाकूर आणि वकील वैशाली बंगेरा या नावांवर चर्चा सुरू आहे. स्थानिक सूत्रांकडून अशी माहिती मिळते की, प्रवीण आणि कविता ठाकूर यांच्या निवडणुकीत प्रशांत ठाकूर यांनी महत्त्वाची भूमिका बजावली होती. त्यामुळे राजकीय समीकरणांमध्ये नव्या गुंतागुंती निर्माण झाल्या आहेत.शेकापच्या वरिष्ठ नेतृत्वाने संभाव्य उमेदवारांवर आधारित सर्वेक्षण अहवाल मागवला आहे. संघटनात्मक बळ, जनाधार आणि लोकांतील स्वीकारार्हता या आधारावर अंतिम निवड होईल.
त्यामुळे अलिबाग नगरपरिषदेची निवडणूक ही रायगड जिल्ह्याच्या राजकीय प्रतिष्ठेची खरी कसोटी ठरणार आहे.अलिबागच्या राजकारणात नातेसंबंध हेसुद्धा महत्त्वाचे घटक ठरतात. माजी नगराध्यक्ष प्रशांत नाईक यांच्या कन्या अदिती नाईक या शिंदे गटाचे आमदार महेंद्र दळवी यांच्या सून आहेत. त्यांच्या एक बहिण जयंत पाटील यांच्या पत्नी असून, दुसरी सुभाष (पंडितशेठ) पाटील यांच्या पत्नी आहेत. या नात्यांच्या संगमामुळे शेकापच्या उमेदवारीच्या निर्णयावर सूक्ष्म पण परिणामकारक छाया पडण्याची शक्यता आहे.


