मुंबई क्रिकेट संघटनेच्या अध्यक्षपदी पुन्हा अजिंक्य नाईक. प्रसाद लाड, मिलिंद नार्वेकरांसह अन्य उमेदवारांचे अर्ज मागे.

0
26
MCA
मुंबई क्रिकेट संघटनेच्या अध्यक्षपदी पुन्हा अजिंक्य नाईक.

मुंबई- मुंबई क्रिकेट संघटनेचे (एमसीए) विद्यमान अध्यक्ष अजिंक्य नाईक यांचा आपल्या पदावर कायम राहण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. ‘एमसीए’च्या बुधवारी (१२ नोव्हेंबर) होणाऱ्या त्रैवार्षिक निवडणुकीत अध्यक्षपदासाठी एकूण आठ जणांनी अर्ज दाखल केले होते. मात्र, सोमवारी (१० नोव्हेंबर) अर्ज मागे घेण्यासाठी देण्यात आलेल्या अखेरच्या दिवशी अजिंक्य नाईक वगळता सर्वच उमेदवारांनी अध्यक्षपदाच्या निवडणुकीतून माघार घेतली. त्यामुळे नाईक यांना ‘एमसीए’ अध्यक्ष म्हणून सलग दुसरा कार्यकाळ मिळणार हे स्पष्ट झाले.

एमसीए’ अध्यक्षपदासाठी नाईक यांच्यासह भारताच्या माजी कर्णधार डायना एडल्जी, भाजप आमदार प्रसाद लाड, शिवसेनेचे (ठाकरे गट) आमदार मिलिंद नार्वेकर, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे (शरद पवार गट) आमदार जितेंद्र आव्हाड, राज्याचे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांचे पुत्र आणि मुंबई ट्वेन्टी-२० लीगचे अध्यक्ष विहंग सरनाईक, ‘एमसीए’चे माजी सहसचिव शाहआलम शेख आणि कार्यकारी परिषदेचे सदस्य सुरज समत यांनी अर्ज दाखल केले होते. मात्र, सोमवारी नाईक वगळता सर्व उमेदवारांनी आपापले अर्ज मागे घेतले.

आव्हाड अध्यक्षपदाच्या शर्यतीतून बाहेर पडले असले, तरी ते उपाध्यक्षपदासाठी उत्सुक आहे. या पदासाठी त्यांच्यासमोर ठाण्याच्या यंग स्टार्स क्रिकेट क्लबकडून अर्ज दाखल केलेल्या नवीन शेट्टी यांचे आव्हान असेल. उपाध्यक्ष, सचिव, कोषाध्यक्ष यासह अन्य सर्व पदांसाठी, तसेच कार्यकारी परिषदेच्या सदस्यत्वासाठी बुधवारी निवडणूक होणार आहे.

एमसीए’ निवडणुकीवरून आधी वादही निर्माण झाला होता. ‘एमसीए’चे माजी कार्यकारिणी सदस्य श्रीपाद हळबे यांच्यासह अन्य सदस्यांनी या निवडणूक प्रक्रियेविरोधात उच्च न्यायालयात धाव घेतली होती. घटनेचे उल्लंघन होणे आणि नियमबाह्यपणे १५५ हून अधिक क्रिकेट क्लबना मतदार यादीत समाविष्ट केल्याचा आरोप करून याचिकाकर्त्यांनी या निवडणुकीला आव्हान दिले होते. मात्र, उच्च न्यायालयाने निवडणूक प्रक्रियेत हस्तक्षेप करण्यास नकार देताना काही अटींसह पुढील कार्यवाहीस परवानगी दिली. त्यामुळे ही निवडणूक ठरल्याप्रमाणे होत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here