पणजी । वार्ताहर
कोकण रेल्वेने पुन्हा एकदा प्रवाशांची सुरक्षा आणि सामाजिक जबाबदारी याप्रतीअसलेली आपली ठाम बांधिलकी सिद्ध केली. त्यांच्या सतर्कतेमुळे आणि वेळेवर हस्तक्षेप केल्यामुळे मत्स्यगंधा एक्स्प्रेस& मधून प्रवास करणाऱ्या एका बेपत्ता मुलाची सुटका करण्यात आली. 20 नोव्हेंबर 2025 रोजी ट्रेन क्रमांक 12619 मत्स्यगंधा एक्स्प्रेसच्या जनरल कोचमध्ये तिकीट तपासणी (Ticket collector)सुरु असताना ही घटना घडली. तिकीट तपासनीस प्रदीप श्रीके यांना तपासणीदरम्यान एक 14 वर्षांचा मुलगा तिकीटाशिवाय प्रवास करताना आढळला. नियमित तपासणी करत असताना श्रीके यांनी पाहिले की, तो मुलगा शाळेच्या गणवेशात आणि दप्तर घेऊन एकटाच प्रवास करत होता. श्रीके यांनी त्या मुलाशी संवाद साधला असता, त्यांना कळाले की तो मुलगा घरुन पळून आला. परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेऊन त्यांनी लगेचच वाणिज्य नियंत्रण विभागाच्याकर्मचाऱ्यांना माहिती दिली आणि रत्नागिरी स्टेशनवर रेल्वे सुरक्षा दलाची मदतमागितली.
आरपीएफची तातडीची कारवाई
श्रीके यांच्या विनंतीला तात्काळ प्रतिसाद देत रत्नागिरी स्टेशनवर उपस्थित असलेल्या आरपीएफ टीमने या प्रकरणाकडे लक्ष दिले. आरपीएफ टीमने त्या मुलाला सुरक्षितपणे आपल्या ताब्यात घेतले आणि पुढील योग्य कारवाईसाठी त्याला सुरक्षित ठिकाणी हलवले. त्यानंतर करण्यात आलेल्या चौकशीत असे कळाले की, हा मुलगा गोव्यातील (Goa) वास्को येथील त्याच्या शाळेतून बेपत्ता झाला होता. त्याच्या पालकांनी मुलाची शोधाशोध सुरु केली होती आणि लोकांकडे मदतीचीही मागणी केली होती.
पालकांसोबत झाली भेट
कोकण रेल्वेचे तिकीट तपासनीस श्रीके यांच्या सतर्कतेमुळे, वाणिज्य नियंत्रण विभागाच्या समन्वयामुळे आणि आरपीएफच्या वेळेवर केलेल्या कारवाईमुळे, हा बेपत्ता मुलगा त्याच्या पालकांना सुरक्षितरित्या भेटू शकला. या घटनेमुळे प्रवाशांची सुरक्षा आणि सामाजिक जबाबदारी पूर्ण करण्याच्या कोकण रेल्वेच्या बांधिलकीची प्रशंसा होत आहे. फ्रंटलाइन कर्मचाऱ्यांची तत्परता आणि विविध विभागांमध्ये असलेला समन्वय यामुळे एक मोठी अनपेक्षित दुर्घटना टळली आणि एका मुलाला त्याचे घर परत मिळाले.