जिंतूरात रा.काँ.ची शक्तीसभा; विकासासाठी सक्षम नेतृत्वाची हाक
जिंतूर : जिंतूर नगरपरिषद सार्वत्रिक निवडणूक २०२५ पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार श्रीमती साबिया बेगम कफिल फारुकी तसेच नगरसेवक पदाचे २५ उमेदवार यांच्या प्रचारार्थ भव्य जाहीर सभा उत्साहात पार पडली. सभेस नागरिकांची मोठी उपस्थिती पाहायला मिळाली.
सभेत बोलताना पक्षनेत्यांनी सांगितले की, “सामान्य नागरिकांचे प्रश्न सोडवण्यासाठी आणि शहराचा सर्वांगीण विकास साधण्यासाठी योग्य व सक्षम नेतृत्व निवडून येणे अत्यंत महत्त्वाचे आहे. मतदारांनी याचा गंभीरपणे विचार करावा.” शिव-शाहू-फुले-आंबेडकर यांच्या विचारधारेवर ठाम राहून विकासाचा ठोस मार्ग मांडण्याचे काम राष्ट्रवादी काँग्रेस करत असल्याचे नेत्यांनी स्पष्ट केले.
नेत्यांनी पुढे सांगितले की, शहराला केंद्राचा निधी आणणे, प्रत्येक घटकापर्यंत विकास पोहोचवणे आणि जिंतूरच्या सांस्कृतिक वारशाचे संवर्धन करणे हे आमचे प्राधान्य आहे. शहराला पुढे नेण्यासाठी सक्षम नेतृत्वाची गरज असून, ती जबाबदारी नागरिकांनी साबिया बेगम कफिल फारुकी यांच्याकडे सोपवावी, असे आवाहन करण्यात आले.
“आमच्या पॅनलमध्ये सर्व जाती-धर्मातील उमेदवारांना संधी दिली आहे. काही अनुभवी तर काही नवखे पण सगळ्यांची जिंतूरच्या विकासासाठी निष्ठा आणि कटिबद्धता आहे.” असे स्पष्ट करण्यात आले. पिंपरी–चिंचवड आणि बारामतीसारखे विकासाचे आदर्श मॉडेल जिंतूरमध्येही घडवू, असा विश्वास वक्त्यांनी व्यक्त केला.
जिंतूर हे नेहमीच धर्मनिरपेक्षतेचा वारसा जपणारे शहर असल्याचे सांगत, “ही निवडणूक केवळ सत्तेसाठी नाही; तर स्वर्गीय कफिल फारुकी यांच्या कार्याला खरी श्रद्धांजली देण्याची संधी आहे.” असेही नमूद करण्यात आले. जास्तीत जास्त उमेदवार विजयी केल्यास जिंतूरच्या विकासाची जबाबदारी अधिक सक्षमपणे पार पाडता येईल, असेही मत मांडण्यात आले.
नागरिकांना घड्याळ चिन्हावरील बटन दाबण्याचे आवाहन करत, “जिंतूरचा चेहरामोहरा बदलण्यासाठी आपण सर्व एकजुटीने उभे राहूया. प्रगत महाराष्ट्राचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी सर्वांनी एकत्र येणे गरजेचे आहे,” असा संदेश सभेतून देण्यात आला.


