Kokan news: ‘घुंगुरकाठी’ संस्थेच्या पुढाकाराने कुडोपी येथील ऐतिहासिक कातळशिल्प परिसरात स्वच्छता उपक्रम
सिंधुदुर्गनगरी : जागतिक वारसा सप्ताहाला (१९ ते २५ नोव्हेंबर) निमित्त ठरवत ‘घुंगुरकाठी’ संस्थेच्या पुढाकाराने कुडोपी येथील ऐतिहासिक कातळशिल्प परिसरात स्वच्छता उपक्रम राबवण्यात आला. २५ नोव्हेंबर रोजी झालेल्या या मोहिमेत मालवणच्या ‘युथ बिट्स फॉर क्लायमेट’ गटाचे कार्यकर्ते तसेच आचरा कॉलेज ऑफ मॅनेजमेंटचे एनएसएस स्वयंसेवक अशा एकूण तीस जणांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवला.
जागतिक वारसा सप्ताहात जगभर विविध वारसा स्थळांची पाहणी, माहिती प्रसार, स्वच्छता व संवर्धनाचे कार्यक्रम घेतले जातात. सिंधुदुर्गातील अश्मयुगीन कातळशिल्पे ही केवळ जिल्ह्याची नव्हे तर मानवजातीची अमूल्य धरोहर मानली जाते. ‘युनेस्को’ने कुडोपी कातळशिल्प स्थळ तात्पुरत्या जागतिक वारसा यादीत समाविष्ट केले असून ते कायमस्वरूपी यादीत घ्यावे म्हणून प्रक्रिया सुरु आहे. कुडोपीसह जिल्ह्यात २० पेक्षा जास्त ठिकाणी अशी कातळशिल्पे आढळली आहेत. पुरातत्त्व संशोधक सतीश लळीत यांनी ६ मे २००१ रोजी हिवाळे येथील कातळशिल्पांचा पहिला शोध लावला होता. त्यांच्या पुढाकाराने धामापूर, खोटले आणि इतर अनेक ठिकाणची कातळशिल्पे उजेडात आली व त्यांनी त्यावर संशोधनपर ग्रंथही लिहिला आहे.
ही शिल्पे जांभ्या दगडी सड्यांवर, निर्जन भागांत असल्यामुळे नैसर्गिक घर्षण, चिरेखाणी आणि दुर्लक्षामुळे अनेक ठिकाणी धोक्यात आली आहेत. जनजागृती आणि वारसा संवर्धनाचा संदेश देण्यासाठी ही स्वच्छता मोहीम आयोजित करण्यात आली. पावसाळ्यात येथे दाट गवत उगवणे, तसेच माती साचण्यामुळे शिल्प झाकले जाते. यासाठी ग्रासकटर, झाडू, ब्रश यांच्या मदतीने काळजीपूर्वक स्वच्छता केली गेली.
ही मोहीम सतीश लळीत यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली. नियोजन ‘घुंगुरकाठी’च्या उपाध्यक्षा डॉ. सई लळीत, ‘युथ बिट्स फॉर क्लायमेट’चे अक्षय रेवंडकर, संजय परुळेकर, साहिल कुबल, तन्मय मुणगेकर, पूजा भोगावकर, सुदेश भोगावकर, दर्शन वेंगुर्लेकर आणि स्वप्नील गोसावी यांनी केले. आचरा कॉलेज ऑफ मॅनेजमेंटच्या एनएसएसच्या सोळा विद्यार्थी-विद्यार्थिनींसह शिक्षक विरेश चव्हाण आणि प्रियांका हिंदळेकर यांनीही सक्रिय सहभाग नोंदवला.
मोहिमेदरम्यान श्री. लळीत यांनी सर्व स्वयंसेवकांना कातळशिल्पांची माहिती दिली. उपक्रमानंतर आचरा कॉलेज ऑफ मॅनेजमेंट स्टडीज येथे त्यांच्या कातळशिल्पांवरील व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले.


