झिरो स्क्रॅप मिशन : मध्य रेल्वेची विक्रमी कामगिरी भंगार विक्रीतून आतापर्यंत ₹२४३ कोटींची कमाई
मध्य रेल्वेची ‘झिरो स्क्रॅप मिशन’ अंतर्गत मोठी कमाई; २०२५-२६ मध्ये भंगार विक्रीतून ₹२४३.०६ कोटी महसूल
मध्य रेल्वेने आर्थिक वर्ष २०२५-२६ मध्ये उत्कृष्ट कामगिरी करत भंगार विक्रीतून एकूण ₹२४३.०६ कोटींचा महसूल मिळवला आहे. रेल्वेच्या मालमत्ता व्यवस्थापन आणि संसाधन वापरातील पारदर्शकता व कार्यक्षमतेचा हा मोठा पुरावा मानला जातो.
विशेष म्हणजे केवळ ऑक्टोबर २०२५ महिन्यातच मध्य रेल्वेने ₹५१.८६ कोटींचे उत्पन्न मिळवले, जे मागील तीन वर्षांतील ऑक्टोबर महिन्याचे सर्वाधिक उत्पन्न आहे. ही वाढ रेल्वेच्या “झिरो स्क्रॅप मिशन” ला मिळालेल्या यशस्वी प्रतिसादाचे प्रतिक आहे.
रेल्वे सूत्रांनुसार, हा महसूल वाढचा ट्रेंड देखभाल प्रक्रिया सुलभ करणे, उपयोगात नसलेल्या सामग्रीचे वेळेवर वर्गीकरण, पारदर्शक लिलाव प्रक्रिया आणि आधुनिक मालमत्ता व्यवस्थापन प्रणालीमुळे शक्य झाला आहे.
२२ पैकी १० कामगिरी निर्देशांकांत प्रथम क्रमांक
मध्य रेल्वे सध्या भारतीय रेल्वेच्या सर्व झोनमध्ये कामगिरी निर्देशांकानुसारही आघाडीवर आहे. २२ पैकी १० ‘परफॉर्मन्स पॅरामीटर्स’मध्ये मध्य रेल्वे देशात पहिल्या क्रमांकावर आहे.
या निर्देशांकांमध्ये आर्थिक शिस्त, संचालन क्षमता, देखभाल, मालवहन, प्रवासी सेवा व्यवस्थापन अशा महत्त्वाच्या विभागांचा समावेश आहे.
अधिकारी सांगतात की, मजबूत नेतृत्व, कडक आर्थिक धोरणे आणि संसाधनांचे स्मार्ट व्यवस्थापन हे या कामगिरीमागचे मुख्य आधार आहेत. मध्य रेल्वे आगामी काळात भंगार व्यवस्थापन आणखी मजबूत करण्याबरोबरच झिरो स्क्रॅप मिशन पूर्ण क्षमतेने राबवण्याचा संकल्पही व्यक्त करत आहे.


