चंद्रनगर शाळेत संविधान दिन साजरा
दापोली- दापोली तालुक्यातील जिल्हा परिषद पूर्ण प्राथमिक आदर्श शाळा चंद्रनगर येथे भारतीय संविधान दिन विविध स्पर्धा व उपक्रमांचे आयोजन करून साजरा करण्यात आला. यावेळी चंद्रनगर गावच्या सरपंच भाग्यश्री जगदाळे, ग्रामविकास अधिकारी संदीप सकपाळ, चंद्रनगर शाळेचे मुख्याध्यापक मनोज वेदक, व्याख्याते महेंद्र जालगांवकर, शिक्षक बाबू घाडीगांवकर, मानसी सावंत, अंगणवाडी पर्यवेक्षिका खांडके, अंगणवाडी सेविका सृष्टी पागडे, विद्या शिगवण आदी उपस्थित होते.
हे पण वाचा रत्नागिरीत समाजकल्याण विभागामार्फत क्रीडा-सांस्कृतिक महोत्सव

सरपंच भाग्यश्री जगदाळे यांच्या हस्ते भारतीय संविधान व डाॅ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमा तसेच भारताचे संविधान या ग्रंथाला पुष्पहार अर्पण करण्यात आला. मुख्याध्यापक मनोज वेदक यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले. यानंतर भारतीय संविधानाच्या उद्देशिकेचे सामूहिक वाचन करण्यात आले. भारतीय संविधानाची निर्मिती व संविधानाचे महत्त्व या विषयावर महेंद्र जालगांवकर यांनी शालेय विद्यार्थ्यांसमोर व्याख्यान दिले. भारतीय संविधान दिनाच्या निमित्ताने शाळेत प्रभातफेरी, घोषवाक्य स्पर्धा, चित्रकला, निबंध तसेच प्रश्नमंजुषा स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते. विजेत्या स्पर्धकांना मान्यवरांच्या हस्ते प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले. संविधान दिनाचे औचित्य साधून शाळेत सेल्फी पाॅईंटची निर्मिती करण्यात आली होती.


