कुंभमेळा नियोजनात १८०० झाडांची तोड ; नाशिककरांच्या आंदोलनाला मनसेचा पाठिंबा

0
4
कुंभमेळा नियोजनात १८०० झाडांची तोड : राज ठाकरे यांचा सरकारवर आरोप, नाशिककरांच्या आंदोलनाला मनसेचा पाठिंबा
कुंभमेळा नियोजनात १८०० झाडांची तोड : राज ठाकरे यांचा सरकारवर आरोप, नाशिककरांच्या आंदोलनाला मनसेचा पाठिंबा

कुंभमेळा नियोजनात १८०० झाडांची तोड : राज ठाकरे यांचा सरकारवर आरोप, नाशिककरांच्या आंदोलनाला मनसेचा पाठिंबा

नाशिक : आगामी कुंभमेळ्याच्या तयारीत राज्य सरकारने तब्बल १८०० झाडे तोडण्याचा निर्णय घेतल्याने नाशिकमध्ये संतापाची लाट उसळली आहे. या निर्णयावर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी सरकारवर जोरदार टीका केली असून, नाशिककरांच्या लढ्याला मनसे ठामपणे साथ देईल, असे विधान त्यांनी केले.

राज ठाकरे म्हणाले की, “नाशिकमध्ये कुंभमेळा आजवर अनेक वेळा झाला आहे. महापालिकेत मनसेची सत्ता असताना आम्हीही मोठ्या प्रमाणावर पायाभूत सुविधा उभारल्या. तेव्हा नगरसेवक आणि प्रशासन यांच्यात उत्तम संवाद होता. नागरिकांच्या गरजा लक्षात घेऊन कामे झाली, त्यामुळे एकाही झाडाची तोड न करता व्यवस्थापन करण्यात आम्ही यशस्वी झालो. त्या उत्कृष्ट नियोजनाबद्दल तेव्हाचे महापौर, नगरसेवक प्रतिनिधी आणि आयुक्त यांचा थेट अमेरिकेत सन्मान झाला होता.”

आता मात्र कुंभमेळ्याच्या नावाखाली मोठ्या प्रमाणात झाडांची कत्तल करून साधूंच्या नावाने जमीन सपाट केली जात असल्याचा गंभीर आरोप त्यांनी सरकारवर केला.

राज ठाकरे म्हणाले, “झाडे तोडल्याची भरपाई म्हणून दुसरीकडे वृक्षलागवड करणार, असे पोकळ आश्वासन सरकार देत असते. प्रत्यक्षात ही झाडे कधी उगवलेली दिसतच नाहीत. जर सरकारकडे झाडे लावण्यासाठी इतकी जागा असेल तर तिकडेच साधुग्राम बांधा.

यापूर्वी भाजप सरकारने लाखो झाडे लावल्याचा दावा केला होता, ती झाडे अद्याप कुठेच दिसत नाहीत, असा खोचक टोला त्यांनी लगावला.

राज ठाकरे यांचा आरोप असा की,
“कुंभमेळ्याचे कारण पुढे करून झाडे तोडा, जमीन सपाट करा, आणि नंतर तीच जमीन लाडक्या उद्योगपतीकडे सुपूर्द करा, असा सरकारचा डाव आहे. सध्या महाराष्ट्रात जमिनी गिळणं, उद्योगपतींचे दलाल म्हणून काम करणं—इतकंच सुरु आहे. सत्ताधारी मंत्री, आमदार आणि त्यांचे नातेवाईक फक्त या चक्रात गुंतले आहेत.”

नाशिककरांचा तीव्र विरोध… मनसेची साथ
नाशिकमध्ये या वृक्षतोडीविरोधात लोकांनी आवाज उठवला असून, मनसे नेत्यांनीही आंदोलकांच्या पाठीशी उभे राहण्याची भूमिका जाहीर केली आहे. “येथे राजकारण नाही. निवडणुका झाल्यानंतरही या वृक्षतोडीला आमचा विरोध कायम राहील,” असे राज ठाकरे म्हणाले.

शेवटी त्यांनी सरकारला इशारा दिला,
उगाच संघर्ष वाढवू नका. लोकांची भूमिका समजून घ्या. पण संघर्ष उभा राहिला तर महाराष्ट्र नवनिर्माण सेना नाशिककरांच्या सोबत खंबीरपणे उभी राहील.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here