कणकवली निवडणुकीत ‘साधूंची एन्ट्री’ ?
कणकवली नगरपंचायतीची निवडणूक राज्यभर चर्चेचा विषय ठरत असताना, शहरात अचानक तीन भस्मधारी यतादारी साधूंनी दाखल होताच राजकीय वातावरणात वेगळीच खळबळ उडाली आहे. अंगभर भस्म लावलेले, उत्तर प्रदेश पासिंगच्या वाहनांमधून आलेले हे साधू पानफळीत दिसल्यापासूनच त्यांच्या आगमनाबाबत विविध तर्क–वितर्कांना उधाण आले आहे.
सध्या कणकवलीत भालचंद्र महाराजांच्या पुण्यतिथी महोत्सवाचे आयोजन सुरू असल्याने, हे साधू त्या धार्मिक कार्यक्रमासाठी आले असावेत, अशी चर्चा प्रथम रंगली. मात्र, या साधूंनी शहरातील दोन्ही राजकीय गटांतील काही उमेदवारांना भेट दिल्याची माहिती पुढे आल्यानंतर ही चर्चा अधिकच तीव्र झाली.
यामुळे हे साधू धार्मिक हेतूने आले आहेत की काही राजकीय पक्षांकडून त्यांना खास रणनीतीचा भाग म्हणून बोलावण्यात आले आहे, असा प्रश्न कणकवलीकरांमध्ये उपस्थित होत आहे. निवडणूक जवळ आल्यानं राजकीय हालचालींना वेग आला असून, साधूंच्या या आगमनाने त्यात आणखी एक गूढ रंग भरला आहे.
कणकवलीत साधूंच्या उपस्थितीमुळे सध्या नागरिक, मतदार आणि राजकीय मंडळी यांच्यात कुतूहल, चर्चा आणि तर्कवितर्कांची मालिका सुरूच आहे.


