चिपळूण निवडणुकीत ठाकरे गटात उफाळली फूट; आमदार भास्कर जाधवांच्या भूमिकेमुळे खळबळ
चिपळूण नगरपरिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) गटात मोठी फूट प्रकर्षाने समोर आली आहे. नगराध्यक्ष पदासह २४ जागांवर अधिकृत उमेदवार उभे करून निवडणुकीत उतरणाऱ्या ठाकरे गटाला स्वतःच्या आमदाराकडूनच धक्का बसल्याने गोट्यात मोठी खळबळ माजली आहे.
पक्षाचे ज्येष्ठ नेते आणि आमदार भास्कर जाधव यांनी पक्षाच्या नियुक्त अधिकृत उमेदवारांना पाठिंबा न देता थेट राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) पक्षाचे उमेदवार रमेश कदम यांच्या बाजूने प्रचार सुरु केला आहे. या भूमिकेमुळे ठाकरे गटाच्या निवडणूक रणनीतीवर गंभीर परिणाम होऊ शकतो, अशी चर्चा आहे.
जाधव यांनी पत्रकार परिषद घेऊन रमेश कदम यांना उघड समर्थन जाहीर केले. स्थानिक पदाधिकाऱ्यांच्या विनंतीमुळे आपण हा निर्णय घेतल्याचे त्यांनी सांगितले. “शब्द दिल्यानंतर मागे हटणे माझ्या स्वभावात नाही,” असे स्पष्ट करत त्यांनी कदम यांच्या सभांमध्ये सहभागही नोंदवला. त्यांच्या या आक्रमक भूमिकेमुळे पक्षांतर्गत नाराजी उच्चांकाला पोहोचली असून, या हालचालींची माहिती थेट मातोश्रीपर्यंत पोहोचल्याचे समजते.
दरम्यान, मातोश्रीकडून जाधव यांना “पक्षाला नुकसान होईल असे कोणतेही पाऊल उचलू नका” असा स्पष्ट संदेश गेल्याची चर्चा आहे. गेले काही महिने खासदार विनायक राऊत आणि भास्कर जाधव यांच्यातील मतभेद वाढत असल्याचे बोलले जात होते. या दोन नेत्यांमधील संघर्ष आता निवडणुकीच्या तोंडावर उघडपणे समोर आला आहे. विनायक राऊत यांनी अधिकृत उमेदवार जाहीर करताना “चिपळूणमध्ये महाविकास आघाडी झालीच नाही” असे नमूद केले होते. तर दुसरीकडे जाधव यांनी वारंवार नाराजीचे संकेत देत “मला एका निर्णयापर्यंत यावेच लागेल” असे सांगत आपली भूमिका सूचित केली होती. अखेर त्यांनी राष्ट्रवादीच्या उमेदवाराला खुले समर्थन देत ठाकरे गटातील अंतर्गत फुट अधिक गडद केली आहे. चिपळूण परिसरात या घटनाक्रमानंतर राजकीय वातावरण तापले असून ठाकरे गटात दोन वेगवेगळे प्रवाह स्पष्टपणे दिसू लागले आहेत.
निवडणुकीच्या ऐन काळात उघड झालेल्या या फुटीमुळे चिपळूण नगरपरिषद निवडणूक अधिकच चुरशीची झाली आहे. आता मातोश्रीकडून सूचना मिळाल्यानंतर आमदार भास्कर जाधव कोणती भूमिका घेतात, हे कोकणातील राजकीय वर्तुळात मोठे औत्सुक्य ठरले आहे.


