मालवणची उपजीविका संकटात, राणेंच्या ‘रोप-वे’ला विरोध
मालवण | प्रतिनिधी
मालवणच्या सिंधुदुर्ग किल्ल्यावर पारंपरिक पद्धतीने होडीच्या सहाय्याने जाण्याच्या असलेल्या व्यवस्थेमध्ये अनेक कुटुंबे गुंतलेली आहेत. या पाश्वभूमीवर मालवण शहरातील सुमारे तीनशे ते चारशे कुटुंबियांच्या रोजगाराचे साधन असणारी किल्ला होडीसेवा बंद करण्याचा घाट शिंदे शिवसेनेचे आमदार नीलेश राणे यांनी घातलेला आहे हा घाट निवडणुकीच्या माध्यमातून जनतेने हाणून पाडावा असे आवाहन मालवणचे माजी आमदार वैभव नाईक यांनी पत्रकार परिषदेत बोलताना केले
मालवण येथील ठाकरे शिवसेना कार्यालयात आयोजित करण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत श्री. नाईक बोलत होते. यावेळी महाविकास आघाडीच्या नगराध्यक्षपदाच्या उमेदवार पूजा करलकर, माजी नगरसेवक नितीन वाळके, माजी जिल्हाप्रमुख भाई
गोवेकर, कोळंब उपसरपंच विजय नेमळेकर, वायरी भूतनाथ सरपंच भगवान लुडबे, महिलाआघाडी तालुकाप्रमुख दीपा शिंदे तसेच इतर पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
यावेळी बोलताना माजी आमदार वैभव नाईक म्हणाले, मालवण शहरातील सुमारे तीनशे ते चारशे कुटुंबियांच्या रोजगाराचे साधन असणारी किल्ला होडीसेवा बंद करण्याचा घाट शिंदे शिवसेनेचे आमदार नीलेश राणे यांनी घातलेला असून त्यामुळे अनेकांचा रोजगार हिरावून घेतला जाणार असल्याची भीती श्री नाईक यांनी व्यक्त करून आमदार राणे यांनी सादर केलेल्या ‘विकासाची अष्टसूत्री’मध्ये किल्ल्यावर जाण्यासाठी रोप-वे करण्यात येणार असल्याचे म्हटले असल्याचा आरोप केला. ते पुढे म्हणाले, शिवसेनेच्या नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार पूजा करलकर यांना मालवणवासीयांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. त्यांनी गेली १९ वर्षे पालिकेचा कारभार सुरळीतपणेसांभाळला आहे.
एकाच प्रभागामध्ये मर्यादित न राहता त्यांन संपूर्ण शहरातील जे-जे प्रश्न असतील, ते सोडविण्याचा प्रयत्न केला आहे. आज त्या
नगरसेविका म्हणून काम करू शकतात. नगराध्यक्ष पद पण त्या चांगल्या प्रकारे हाताळू शकतात. त्यामुळे माझी मालवणवासीयांना नम्र विनंती आहे की, या शहराचा विकासाचा पायामाहिती असलेल्या पूजा करलकर याच विकास करू शकतात, त्यांच्या पाठिशी जनतेने ठामपणे उभे रहावे, असेही श्री. नाईक म्हणाले. नीलेश राणे या विभागाचे पहिल्यांदा खासदार होते. अडीच वर्षांत सत्ता परिवर्तन झाले. त्यावेळी मी या मतदारसंघाचा विकास करतोय, असे सांगत आहेत. गेले एक वर्ष ते आमदार म्हणून काम करीत आहेत. त्यांची व्हिजन डॉक्युमेंटरी मी काल पाहिली, तेव्हा लक्षात आलं की गेली दहा-पंधरा वर्षे काम करून त्यांना या शहराच्या रोजगाराच्या संधी काय आहेत, हे देखील माहिती नाही, असेच यातून दिसून आल्याचा आरोप श्री. नाईक यांनी केला. आज जवळजवळ तीनशे ते चारशे कुटुंबे सिंधुदुर्ग किल्ला प्रवासी वाहतुकीवर अवलंबून आहेत. या प्रवासी वाहतुकीमुळे
पर्यटकांना एक वेगळेपण पाहायला मिळते. या लाकडी बोटींच्या सहाय्याने समुद्रातून किल्ला भ्रमंतीसाठी वाहतूक केली जाते. त्यामुळे मालवणवासीयांची ही परंपरा आहे. हे एक वेगळे वैशिष्ट्य आहे. परंतु रोप-वे करून या लोकांच्या पोटावर लाथ
मारण्याचे काम आमदार नीलेश राणे करणार आहेत, असा आरोप श्री. नाईक यांनी केला.
मालवणमध्ये इंटरनॅशनल शाळा आणणार, असे आमदार राणे सांगत आहेत. मात्र यापूर्वी राणे कुटुंबियांनी मालवण शहरातील एसटी स्टॅण्ड येथील कुडाळकर हायस्कूल नावाने असलेले हायस्कूल घेतले होते. त्या ठिकाणची इमारत आज पाडण्यात आली
आहे. हायस्कूल राणे कुटुंबियांनी चांगलं करण्यासाठी घेतले. त्या हायस्कूलची इमारत आता जमीनदोस्त करून शाळा हलविण्यात आली आहे. शाळासुद्धा हळुहळु बंद होण्याच्या स्थितीत पोहचली आहे. याला राणे कुटुंबियच जबाबदार असल्याचा आरोप करीत, यामुळे जनतेला खोटी आश्वासने देण्याचे बंद करण्याची वेळ आली आहे, असेही श्री. नाईक म्हणाले. आमदार राणे यांनी सादर केलेल्या विकासाची अष्टसुत्रीतील पहिल्या पानावर सिंधुदुर्ग किल्ल्याचा फोटो लावण्याऐवजी किल्ले जंजिराचा फोटो लावला आहे. ज्यांना किल्ले सिंधुदुर्ग आणि जंजिरा किल्यातील फरक समजत नाही, ज्यांना रोप वे मुळे रोजगारवर संकट येईल हे माहिती नाही,
कुडाळकर हायस्कूल ही आपली शाळा कशी होती, याचा इतिहास माहिती नाही, अशा लोकांकडून विकासाची अपेक्षाच करणे चुकीचे आहे.
हे आज विकासावर बोलत नाहीत. कारण आज कुडाळ-मालवण रस्ता, कसाल-मालवण रस्ता, कणकवली- आचस, रस्ता, या शहरातील रस्ते हे रस्ते गेल्या वर्षभरात कशापद्धतीने झाले हे सर्वांसमोर आहेत. हे विकास करू शकत नाहीत. आमच्या नगराध्यक्षपदाच्या उमेदवार पूजा, करलकर या विकास करू शकतात. त्यामुळे, त्यांच्या पाठिशी मालवणच्या जनतेने राहावे, असे आवाहन श्री. नाईक यांनी केले आहे.


