चिपळूण – बहादूरशेख नाका येथे सुरू असलेल्या उड्डाणपुलाच्या कामातील गर्डर सोमवारी दुपारी पावणेतीन वाजता काही क्षणातच खाली कोसळले. या अपघातात लॉंचर आणि २५ गर्डर तुटून सुमारे १५ कोटींचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे. उड्डाणपुलाच्या दोन पिलरमध्ये १५ गर्डर बसवले जातात. बहादूरशेखनाका येथील मुख्य चौकातच गर्डर बसविण्याचे काम सुरू असताना अपघात झाल्याने त्याची खबरदारी ठेकेदार व महामार्ग विभागाने घेतली होती. कऱ्हाडकडे जाणारी वाहने बहादूरशेख नाक्याच्या वाशिष्ठी पुलापर्यंत जाऊन तेथून वळवली जात होती. https://sindhudurgsamachar.in/maharashtra-एसटीची-मलीन-प्रतिमा-सुध/
नागरिकांची हानी टाळण्यासाठी खबरदारी घेतली तरी सोमवारी लॉंचर आणि गर्डरचे मोठे नुकसान टाळता आले नाही. उड्डाणपुलाचे गर्डर हायड्रोलिक सिस्टीमने बसविण्यासाठी लॉंचरचा उपयोग केला जातो. या लॉंचरची किंमत सुमारे साडेतीन कोटी रुपये आहे. अपघातात लॉंचर मधोमध तुटला आहे. तसेच २५ गर्डर पूर्णपणे तुटले आहेत. साधारणत: एका गर्डरसाठी ८० टन लोखंड वापरले जाते.
आज बाजारात ७० रुपये किलो दराने स्टीलची विक्री सुरू आहे. सिमेंट आणि इतर साहित्य मिळून एका गर्डरसाठी ७० लाखांचा खर्च येतो. लॉंचरसह २५ गर्डरचे सुमारे १५ कोटींचे नुकसान झाले.
याबाबत ईगल कंपनीचे जनसंपर्क अधिकारी जयंतीलाल नानेचा म्हणाले, ‘‘गर्डर बांधणीच्या कामात कोणत्याही प्रकारचा हलगर्जीपणा झालेला नाही. प्रत्येक ब्लॉकला दोन्ही बाजूने हायड्रोलिक टेन्शन लावून आठ ते दहा तास तपासणी केली जाते. महामार्गावरून रोज जेवढी वाहने जातात, त्याच्या पाचपट लोड देऊन उड्डाणपुलाची तपासणी वारंवार केली जाते. अशा पद्धतीने या कामाची गुणवत्ता तपासली जाते. आजही त्याच पद्धतीने गुणवत्ता तपासणीचे काम सुरू असताना दोन गर्डर मधोमध खचले. ते दोन गर्डर सुलभपद्धतीने खाली घेऊन त्या जागी नवीन गर्डर बसवण्याचे नियोजन आम्ही केले होते. त्याच दरम्यान हा अपघात झाला.