उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या पाठिंब्यामुळे पुणे पत्रकार प्रतिष्ठानला नवी जागा उपलब्ध :
उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या पाठिंब्यामुळे पुणे पत्रकार प्रतिष्ठानला नवी जागा उपलब्ध :
पुणे l प्रतिनिधी
पुणे पत्रकार प्रतिष्ठानला नवी जागा उपलब्ध झाल्याबद्दल आनंद व्यक्त करण्यासाठी प्रतिष्ठानचे पदाधिकारी आणि पत्रकार प्रतिनिधींनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांची सदिच्छा भेट घेतली. यावेळी पवार यांनी सर्वांचे अभिनंदन करत भविष्यातील कार्यासाठी शुभेच्छा दिल्या.
या भेटीत विविध राजकीय व सामाजिक विषयांवर सविस्तर चर्चा झाली. पत्रकार हे लोकशाहीचा चौथा स्तंभ असून, तथ्यपूर्ण माहिती जनतेपर्यंत पोहोचवण्याचे महत्त्वाचे काम ते निष्ठेने पार पाडतात. त्यामुळे त्यांना सुरक्षित, सुसज्ज आणि सक्षम कार्यपरिसर उपलब्ध करून देणे ही सरकारची जबाबदारी असल्याचे पवार यांनी सांगितले. पुणे पत्रकार प्रतिष्ठानला उपलब्ध झालेली नवीन जागा संवाद, प्रशिक्षण, पत्रकारिता अभ्यास आणि माध्यम क्षेत्रातील बदलत्या तंत्रज्ञानाच्या अध्ययनासाठी एक महत्त्वाचे केंद्र बनेल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.
नवीन जागेमुळे प्रतिष्ठानची पुढील योजना अधिक वेगाने राबवता येईल आणि पत्रकारांच्या कामात नवे बळ मिळेल, असेही त्यांनी नमूद केले.पुण्याच्या प्रगतिशील आणि वैचारिक परंपरेला पत्रकार बांधवांनी नेहमीच योग्य न्याय दिला आहे. हीच परंपरा अधिक बळकट व्हावी यासाठी शासनाकडून सर्वतोपरी सहकार्य दिले जाईल, असे आश्वासनही पवार यांनी दिले.