नवी मुंबईत कंत्राटी कामगारांसाठी पुणे पॅटर्नची मागणी
नवी मुंबई —
नवी मुंबई महानगरपालिकेतील कंत्राटी कामगारांना स्थैर्य, पारदर्शकता आणि न्याय मिळावा, यासाठी पुणे महानगरपालिकेने ३ डिसेंबर २०२४ रोजी जारी केलेल्या परिपत्रकाच्या धर्तीवर कामगारहिताचे नियम तातडीने लागू करण्यात यावेत, अशी मागणी राष्ट्रवादी महाराष्ट्र जनरल कामगार युनियनतर्फे आयुक्तांकडे निवेदनाद्वारे करण्यात आली. युनियनचे अध्यक्ष संजय सुतार यांच्या नेतृत्वाखालील प्रतिनिधी मंडळाने हे निवेदन सादर केले.
या निवेदनात नमूद केले आहे की नवी मुंबईतील हजारो कंत्राटी कामगारांना वेळेवर वेतन, अधिकृत कागदपत्रे, सुरक्षित कार्यपरिसर आणि कायद्याने मिळणाऱ्या सुविधा मिळण्यात अनेक अडथळे येतात. त्यामुळे पुणे महानगरपालिकेच्या आदर्श ‘कामगारहित’ मॉडेलप्रमाणे प्रणाली नवी मुंबईतही लागू करणे अत्यावश्यक असल्याचे युनियनने स्पष्ट केले.
प्रतिनिधी मंडळाने आयुक्तांना सांगितले की कंत्राटी कामगारांचे मासिक वेतन प्रत्येक महिन्याच्या ५ ते ७ तारखेत जमा करणे बंधनकारक करावे, वेतन पावतीत उपस्थिती, कपाती आणि संपूर्ण वेतन संरचनेचा स्पष्ट उल्लेख करावा आणि प्रत्येक कामगाराला नियुक्तीपत्र देणे अनिवार्य करावे. पुण्याप्रमाणे कंत्राटी कामगारांसाठी स्वतंत्र डिजिटल पोर्टल सुरू करून त्यात नियुक्ती तपशील, वेतन माहिती, तक्रारी आणि सेवा नोंदी अद्ययावत ठेवण्याची सुविधाही आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले.
हे पण वाचा संसदीय अभ्यासवर्ग उद्घाटन
तसेच कामगारांसाठी PF, ESIC, वेतन तक्रारी आणि सेवा नोंदी यासाठी स्वतंत्र कल्याण कक्ष स्थापन करणे, किमान वेतन आणि कामगार कायद्यांचे काटेकोर पालन सुनिश्चित करणे, महिला कामगारांसाठी सुरक्षित कार्यस्थळ व मातृत्व रजा उपलब्ध करणे आणि सुरक्षा साहित्य वेळेवर पुरवणे या मुद्द्यांवरही युनियनने ठाम भूमिका मांडली.
“पुणे महापालिकेच्या धर्तीवर हे नियम लागू झाल्यास नवी मुंबईतील हजारो कंत्राटी कामगारांना हक्कांचे संरक्षण मिळेल, त्यांच्या कामात पारदर्शकता वाढेल आणि सेवा स्थिरता निर्माण होईल,” असे अध्यक्ष संजय सुतार यांनी सांगितले.
कामगारांच्या हितासाठी तातडीने पावले उचलावीत, अशी अपेक्षा यानिमित्ताने व्यक्त केली आहे.


