भारतीय संविधानाच्या अमृतमहोत्सवी वर्षानिमित्त ‘गौरवशाली वाटचाल’ ग्रंथाचे राज्यपालांच्या हस्ते प्रकाशन
मुंबई : भारतीय गणराज्याच्या ७५व्या वर्षपूर्तीनिमित्त मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या विधानसभेतील भाषणांवर आधारित ‘भारतीय संविधान – गौरवशाली अमृतमहोत्सवी वाटचाल’ या महत्वाच्या ग्रंथाचे प्रकाशन राज्यपाल आचार्य देवव्रत यांच्या हस्ते आज करण्यात आले. भारतीय लोकशाहीची वाटचाल, संविधानाची मूल्ये आणि स्वातंत्र्योत्तर भारताच्या विकासाचा प्रवास याचे सखोल दर्शन घडवणारा हा ग्रंथ विधिमंडळाच्या अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर प्रकाशित झाला.
प्रकाशन कार्यक्रमाला विधानपरिषदेचे सभापती प्रा. राम शिंदे, विधानसभेचे अध्यक्ष ॲड. राहुल नार्वेकर, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, विधानपरिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे, विधानसभा उपाध्यक्ष अण्णा बनसोडे, संसदीय कार्य मंत्री चंद्रकांत पाटील तसेच मंत्रिमंडळातील सदस्य आणि विधिमंडळाचे अनेक मान्यवर उपस्थित होते.
या प्रसंगी बोलताना मान्यवरांनी भारतीय संविधानाच्या सामर्थ्याची, लोकशाहीच्या चिरकालीन परंपरेची आणि या मूल्यांना बळकटी देण्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या भूमिका व विचारांचे महत्त्व अधोरेखित केले. स्वातंत्र्यानंतरच्या भारताच्या प्रगतीचा व लोकशाही संस्थांच्या दृढीकरणाचा उल्लेख या ग्रंथात प्रभावीपणे करण्यात आल्याचेही सांगण्यात आले.
संविधानाच्या अमृतमहोत्सवी वर्षानिमित्त प्रकाशित झालेला हा ग्रंथ विधिमंडळ सदस्यांसह संशोधक, अभ्यासक आणि सर्वसामान्य नागरिकांसाठी मार्गदर्शक ठरेल, असा विश्वास यावेळी व्यक्त करण्यात आला.


