दिल्लीकरांच्या चवीला मोहित करणारा ‘महाराष्ट्र खाद्य महोत्सव – 2025’ यशस्वी संपन्न
दिल्ली l
देशाच्या राजधानीत गेल्या तीन दिवसांपासून कस्तुरबा गांधी मार्गावरील नवीन महाराष्ट्र सदनाच्या प्रांगणात आयोजित ‘महाराष्ट्र खाद्य महोत्सव – 2025’ हा महोत्सव दिल्लीकरांच्या चवेला खमंग दरवळ देत यशस्वी ठरला. केवळ स्वादिष्ट खाद्यपदार्थांचा आनंद घेण्यापुरता हा महोत्सव मर्यादित राहिला नाही, तर महाराष्ट्राच्या विविध सांस्कृतिक वारसा आणि ग्रामीण महिलांच्या सक्षमीकरणाचा राष्ट्रीय स्तरावरही ठसा उमटवणारा ठरला.
या महोत्सवाचे उद्घाटन प्रसिद्ध शेफ विष्णू मनोहर यांच्या हस्ते करण्यात आले. प्रमुख आकर्षण ठरले ते महाराष्ट्रातील आठ जिल्ह्यांतील ‘उमेद’ योजनेअंतर्गत कार्यरत महिला स्वयंसहाय्यता गटांचा सहभाग. अमरावती, जळगाव, सातारा, कोल्हापूर, सिंधुदुर्ग, ठाणे, बीड आणि नागपूर येथील प्रशिक्षित महिलांनी आपले पारंपरिक आणि घरगुती पदार्थ राष्ट्रीय स्तरावर सादर केले आणि यामुळे त्यांच्या कौशल्यांना नवसंजीवनी मिळाली.
महिलांनी निवासी आयुक्त आर. विमला यांचे आभार मानत सांगितले की, “ही संधी मिळाल्यामुळे आमच्या ग्रामीण स्वप्नांना पंख मिळाले आहेत.” समारोप समारंभात आर. विमला यांनी महाराष्ट्र सदन व महाराष्ट्र परिचय केंद्राचे अधिकारी कर्मचारी आणि ‘उमेद’च्या महिलांचे कौतुक केले. यावेळी महाराष्ट्र परिचय केंद्राचे संचालक हेमराज बागुल, सहायक निवासी आयुक्त नितीन शेंडे, स्मिता शेलार, जनसंपर्क अधिकारी मनीषा पिंगळे, व्यवस्थापक प्रमोद कोळपते, उपअभियंता किरण चौधरी, आशुतोष द्विवेदी आदी वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.
हा महोत्सव केवळ खाद्यपदार्थांचा नव्हे तर महाराष्ट्राच्या ग्रामीण महिलांच्या सामर्थ्याचा आणि सांस्कृतिक वैभवाचा उत्सव ठरला


