साळशी गावात दूरसंचार सेवा कोलमडली

0
108
साळशी गावात दूरसंचार सेवा कोलमडली
साळशी गावात दूरसंचार सेवा कोलमडली

साळशी गावात दूरसंचार सेवा कोलमडली ; तीन दिवसांपासून 2G बंद, फोन सेवा ठप्प

देवगड I पांडुशेठ साटम

देवगड तालुक्यातील साळशी गावातील दूरसंचार संभाषण व्यवस्था पूर्णतः विस्कळीत झाल्याने नागरिकांची मोठ्या प्रमाणात गैरसोय होत आहे. गेल्या तीन दिवसांपासून बीएसएनएलची 2G सेवा पूर्णपणे बंद असून मोबाईल व लँडलाईन फोन सेवा देखील अत्यंत निकृष्ट अवस्थेत आहे. संभाषण करताना आवाज न येणे, कॉल सुरू असताना मध्येच फोन बंद पडणे, एकाच नंबरवर दोन-तीन वेळा प्रयत्न केल्यानंतरच उशिरा संपर्क होणे अशा अनेक समस्यांनी भ्रमणध्वनी धारक अक्षरशः कंटाळले आहेत.
साळशी गावात भारत दूरसंचार निगम लिमिटेड (BSNL) व्यतिरिक्त कोणतीही पर्यायी सेवा कंपनी नसल्याने ही समस्या अधिक गंभीर बनली आहे. परिणामी आपत्कालीन परिस्थितीत तसेच वैद्यकीय मदतीसाठी रात्री-अपरात्री तब्बल ६ किलोमीटर अंतरावर असलेल्या शिरगाव येथे जावे लागते, ही बाब अत्यंत धोकादायक ठरत आहे.
दूरसंचार सेवा ठप्प झाल्याचा फटका गावाच्या दैनंदिन जीवनाला बसला असून ऑनलाईन कार्यालयीन कामे, शासकीय व्यवहार, धान्य दुकान वितरण व्यवस्था, विद्यार्थ्यांचा ऑनलाईन अभ्यास, शेतकऱ्यांचे शेतीसाठी पाणी मोटर पंप, तसेच व्यापारी व इतर व्यवसायिकांचे आर्थिक व्यवहार पूर्णतः ठप्प झाले आहेत. त्यामुळे ग्रामस्थांना मोठ्या आर्थिक नुकसानीला सामोरे जावे लागत आहे.
या गंभीर समस्येबाबत वेळोवेळी दूरसंचार विभाग देवगड व सावंतवाडी कार्यालयाशी संपर्क साधून अनेकदा लेखी पत्रव्यवहार करण्यात आला. तसेच ग्रामपंचायत कार्यालय साळशी यांनी सविस्तर अहवाल पाठवूनही प्रशासनाकडून सोयीस्कर दुर्लक्ष करण्यात आले असून कोणतीही ठोस कार्यवाही झालेली नाही, असा आरोप ग्रामस्थांकडून केला जात आहे.
इतकेच नव्हे तर ग्राहकांनी स्वतः देवगड व सावंतवाडी दूरध्वनी कार्यालयात लेखी तक्रारी, प्रत्यक्ष भेटी तसेच शिरगाव येथे जाऊन दूरध्वनीवरूनही वारंवार संपर्क साधला, मात्र या तक्रारी बेदखल केल्या गेल्याने नागरिकांमध्ये प्रचंड नाराजी आहे. साळशी ग्रामपंचायतीचे सरपंच यांनी ऑगस्ट महिन्यापासून सातत्याने सावंतवाडीचे प्रबंधक व देवगडचे विभागीय अभियंता यांच्याशी पत्रव्यवहार व प्रत्यक्ष भेटी घेऊन समस्या निवारणाची मागणी केली, तरीही अद्याप कोणतीही पूर्तता झालेली नाही.
अखेर ग्रामपंचायत साळशी यांनी थेट माननीय मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य यांच्या कार्यालयाकडे अडचण पत्र व ई-मेलद्वारे तक्रार दाखल करून लक्ष वेधले. मुख्यमंत्री कार्यालयाकडूनही दूरसंचार विभाग देवगड-सावंतवाडी यांना सूचना देण्यात आल्या, मात्र त्यालाही कोणतीच दाद दिली गेली नाही, ही बाब अधिकच संतापजनक आहे.
सध्या सलग तीन दिवसांपासून साळशी येथील दूरध्वनी सेवा विस्कळीत असून 2G सेवा पूर्णपणे बंद, कॉल खंडित होणे, आवाज न येणे या समस्यांवर कोणतीही कार्यवाही होत नाही. उलट संबंधित अधिकाऱ्यांकडून उद्धट व असंवेदनशील उत्तरे मिळत असल्याने ग्राहकांमध्ये कमालीचा असंतोष पसरला आहे. परिणामी सार्वजनिक सेवा कोलमडून संपूर्ण गावाची यंत्रणा ठप्प झाली असून ऑनलाईन व्यवहार अक्षरशः अशक्य झाले आहेत.
या प्रशासनाच्या दिरंगाई व दुर्लक्षाविरोधात लवकरच आंदोलनाच्या माध्यमातून लक्ष वेधले जाणार असून केव्हाही आकस्मिक आंदोलन छेडण्याच्या तयारीत ग्रामस्थ एकवटले आहेत, असा इशारा ग्रामपंचायत व नागरिकांनी दिला आहे.
दूरसंचार विभागाने तातडीने दखल न घेतल्यास ही नाराजी उग्र स्वरूप धारण करण्याची शक्यता नाकारता येत नाही.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here