कणकवलीत राजकीय हालचालींना वेग
राजन तेली–वैभव नाईक यांची गुप्त भेट, चर्चांना उधाण
कणकवली l
कणकवली शहरात सोमवारी रात्री शिंदे सेनेचे नेते तथा माजी आमदार !¡राजन तेली आणि उद्धव ठाकरे सेनेचे माजी आमदार वैभव नाईक यांची भेट झाली. ही भेट कणकवलीतील राजन तेली यांच्या निवासस्थानी झाली असून सुमारे अर्धा तास दोघांमध्ये विविध विषयांवर चर्चा झाल्याची माहिती समोर आली आहे.
या भेटीत कणकवली नगरपंचायत निवडणुकीसंदर्भात चर्चा झाल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. दरम्यान, याच दिवशी राजन तेली यांनी पत्रकार परिषद घेऊन जिल्हा बँकेत बेकायदेशीर कर्ज वाटप झाल्याचा आरोप केला होता. या आरोपांचे पुरावेही त्यांनी पत्रकार परिषदेत सादर केले होते.
त्यानंतर आमदार निलेश राणे यांनी सोशल मीडियावर प्रतिक्रिया देत जिल्हा बँकेची कामगिरी उत्कृष्ट असल्याचे म्हटले आहे. सिंधुदुर्ग जिल्हा बँक सर्वोत्कृष्ट होण्यासाठी अध्यक्ष मनीष दळवी आणि संचालक मंडळ चांगले काम करत असल्याचे त्यांनी नमूद केले. महायुतीमध्ये सकारात्मक वातावरण राहावे यासाठी सर्वांनी प्रयत्न करावेत, वैयक्तिक अजेंडा आणू नये, चर्चेतून मार्ग निघू शकतो, मात्र टीकेची गरज नसल्याचे मत त्यांनी व्यक्त केले आहे.
या पार्श्वभूमीवर राजन तेली आणि वैभव नाईक यांची झालेली भेट राजकीय दृष्ट्या महत्त्वाची मानली जात असून कणकवलीसह जिल्ह्यातील राजकीय वर्तुळात उलटसुलट चर्चांना उधाण आले आहे.


