कोल्हापूरची सई जाधव – इंडियन मिलिटरी अकादमीची पहिली महिला अधिकारी!
कोल्हापूर l प्रतिनिधी
कोल्हापूरच्या सई जाधव यांनी अवघ्या २३ वर्षी भारतीय सैन्याची प्रतिष्ठित संस्था इंडियन मिलिटरी अकादमी (IMA), देहरादून येथून उत्तीर्ण होणारी पहिली महिला अधिकारी म्हणून इतिहास रचला आहे, अशी माहिती विविध वृत्तसंस्थांनी दिली आहे. साईचा हा विक्रम ९३ वर्ष जुन्या परंपरेला तोडणारा आहे, कारण १९३२ मध्ये अकादमीच्या स्थापनेपासून आतापर्यंत ६७,०००हून अधिक अधिकारी प्रशिक्षण पूर्ण करून बाहेर पडले आहेत, पण कोणतीही महिला अधिकारी म्हणून पास आउट झाली नव्हती.

सई जाधव यांना टेरिटोरियल आर्मीमध्ये लेफ्टनंट म्हणून कमीशन मिळाले आहे, आणि त्या IMA मधून उत्तीर्ण होणाऱ्या पहिल्या महिला अधिकारी म्हणून इतिहासात नावलौकिक मिळवत आहेत.
त्यांची ही कामगिरी केवळ वैयक्तिकच नाही, तर भारतीय सैन्यात लैंगिक समानतेच्या दिशेने एक महत्त्वाचा टप्पा गाठणारी ठरली आहे. त्यांच्या कुटुंबाची सैन्य सेवा परंपरा विशेष लक्षवेधी आहे . त्यांचे आजोबा म्हणजेच वडिलांचे वडील ब्रिटिश आर्मीमध्ये सेवा देत होते, आजोबा भारतीय सैन्यात अधिकारी होते आणि वडील संदीप जाधव सध्या भारतीय सैन्यात कार्यरत आहेत; साईची ही चौथी पिढी म्हणून देशसेवा करत आहे.
सई ने राष्ट्रीय स्तरावरील परीक्षेत यश मिळवून IMA मध्ये प्रवेश घेतला आणि सहा महिन्यांच्या कठीण प्रशिक्षणानंतर पुरुष कडेट्ससोबत समान निकषांवर उत्तीर्ण झाली. तिच्या पासिंग-आऊट परेडमध्ये आई-वडिलांनी त्यांच्या खांद्यावर स्टार्स लावले हा क्षण अनेकांसाठी प्रेरणादायी ठरला.
या यशामुळे भारतीय सैन्य सेवेत महिलांच्या सहभागाच्या संधींना अधिक बळ मिळाले आहे आणि भविष्यात अनेक तरुणींसाठी प्रेरणादायी मार्ग उघडेल अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.


