नवी मुंबई महापालिका निवडणुकीसाठी तयारी अंतिम टप्प्यात
नवी मुंबई : नवी मुंबई महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक २०२५–२६ च्या पार्श्वभूमीवर महापालिका आयुक्त डॉ. कैलास शिंदे यांनी पत्रकारांशी संवाद साधत निवडणूक प्रक्रियेबाबतची सविस्तर माहिती दिली.
यावेळी त्यांनी निवडणूक तयारी, प्रशासकीय उपाययोजना, आदर्श आचारसंहितेची अंमलबजावणी तसेच पारदर्शक आणि शांततामय निवडणूक पार पाडण्यासाठी महापालिका व संबंधित यंत्रणांकडून करण्यात येणाऱ्या कार्यवाहीचा आढावा घेतला.
डॉ. शिंदे यांनी मतदार नोंदणी अद्ययावत करणे, मतदान केंद्रांची योग्य व्यवस्था, सुरक्षा नियोजन, निवडणूक कर्मचाऱ्यांचे प्रशिक्षण आणि तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर यावर विशेष भर देण्यात येत असल्याचे स्पष्ट केले. निवडणूक आयोगाच्या सर्व मार्गदर्शक सूचनांनुसारच प्रक्रिया राबवली जाईल, असेही त्यांनी सांगितले.
पत्रकारांच्या प्रश्नांना उत्तर देताना त्यांनी नागरिकांनी निर्भयपणे आणि मोठ्या संख्येने मतदान प्रक्रियेत सहभागी व्हावे, असे आवाहन केले. तसेच निवडणूक काळात माध्यमांनी जबाबदार आणि सकारात्मक भूमिका बजावावी, अशी अपेक्षाही डॉ. शिंदे यांनी व्यक्त केली.


