कासार्डे येथे कस्तुरी पाताडे हिला श्रद्धांजली
डॉक्टरांच्या हलगर्जीपणाचा आरोप, कारवाईची मागणी
कणकवली l
युवती कस्तुरी पाताडे हिच्या मृत्यूनंतर कासार्डे येथे ग्रामस्थांच्या वतीने श्रद्धांजली सभेचे आयोजन करण्यात आले. यावेळी कस्तुरी पाताडे हिचा मृत्यू डॉक्टरांच्या हलगर्जीपणामुळेच झाल्याचा गंभीर आरोप तिच्या नातेवाईकांसह ग्रामस्थांनी केला.
या वेळी बोलताना माजी उपसभापती प्रकाश पारकर यांनी तीव्र भावना व्यक्त केल्या. “आम्हाला न्याय मिळालाच पाहिजे. संबंधित डॉक्टरांवर कठोर कारवाई झाली पाहिजे. मृत्यू झालेली आमची मुलगी आम्हाला परत द्या. कुठलाही गुन्हा दाखल करण्यासाठी आम्ही तयार आहोत. दहा कोटी रुपये दिले तरी आम्हाला आमची मुलगी परत मिळणार नाही,” असे ते म्हणाले.
श्रद्धांजली सभेला माजी जिल्हा परिषद सदस्य संजय देसाई, माजी बांधकाम सभापती रवींद्र जठार, माजी पंचायत समिती सभापती दिलीप तळेकर, कासार्डे सरपंच निशा नकाशे, उपसरपंच गणेश पाताडे, निवृत्त पोलीस अधिकारी सुर्यकांत तळेकर, माजी सरपंच संतोष पारकर, रविंद्र पाताडे यांच्यासह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
यावेळी उपस्थितांनी कस्तुरी पाताडे हिला न्याय मिळेपर्यंत लढा सुरू ठेवण्याचा निर्धार व्यक्त केला.