नवी मुंबईतील वाढत्या वायू प्रदूषणाविरोधात २० डिसेंबरला मूक मानव साखळी
नवी मुंबईतील वाढत्या वायू प्रदूषणाच्या पार्श्वभूमीवर तातडीने आणि प्रभावी उपाययोजना राबवाव्यात, या मागणीसाठी ‘उर्वरी’ या युवक नेतृत्वाखालील पर्यावरणीय संस्थेतर्फे मूक मानव साखळी आयोजित करण्यात येणार आहे. हा शांततामय उपक्रम शनिवारी, २० डिसेंबर २०२५ रोजी सकाळी ७ ते ९ या वेळेत, मिनी सी-शोर, सेक्टर १०-ए, वाशी येथे होणार आहे.
या मूक मानव साखळीत नवी मुंबईतील विविध भागांतील नागरिक, युवक व विद्यार्थी सहभागी होणार असून, सार्वजनिक आरोग्यावर गंभीर परिणाम करणाऱ्या वाढत्या वायू प्रदूषणाकडे शासनाचे लक्ष वेधणे हा या आंदोलनाचा मुख्य उद्देश आहे. स्वच्छ हवा हा नागरिकांचा मूलभूत हक्क असून, प्रदूषण नियंत्रणासाठी ठोस आणि अंमलबजावणीयोग्य धोरणांची आवश्यकता असल्याचे आयोजकांचे म्हणणे आहे.
या उपक्रमाच्या माध्यमातून पर्यावरण संरक्षणाबाबत जनजागृती निर्माण करणे आणि नागरिकांचा सामूहिक आवाज शासनापर्यंत पोहोचवणे, हा ‘उर्वरी’ संस्थेचा हेतू असल्याचेही यावेळी सांगण्यात आले.

