कणकवली कुणाची? आज सत्तेचा फैसला
कणकवलीची ही निवडणूक आता नगरपंचायतीपुरती राहिलेली नाही, तर ती सत्ताधारी भाजपविरुद्ध उभ्या राहिलेल्या सर्वपक्षीय राजकीय बंडाची रणधुमाळी ठरली आहे. सत्तेत असतानाच भाजपला थेट आव्हान देणारी शहरविकास आघाडी, विक्रमी ७९.७१ टक्के मतदान आणि राणे कुटुंबातील दोन भावांमधील अप्रत्यक्ष राजकीय शक्तिपरीक्षा या सगळ्यामुळे कणकवली कुणाची? हा प्रश्न आज केवळ शहराचा नाही, तर संपूर्ण महाराष्ट्राच्या राजकीय चर्चेचा केंद्रबिंदू बनला आहे. २१ डिसेंबरला येणारा निकाल सत्ता टिकवणारा ठरेल की बदलाची नांदी ठरेल, याकडे साऱ्यांचे लक्ष लागले आहे.
कणकवली | प्रतिनिधी
कणकवली नगरपंचायत निवडणूक यंदा केवळ स्थानिक स्वराज्य संस्थेची निवडणूक न राहता, राज्यातील सत्तासमीकरणे आणि राजकीय ताकद मोजणारी महत्त्वाची लढाई ठरली आहे. भाजपविरोधात सर्व प्रमुख पक्ष एकत्र येत स्थापन झालेली शहरविकास आघाडी आणि सत्ताधारी भाजप यांच्यातील ही थेट लढत आता निर्णायक टप्प्यावर आली आहे. त्यामुळे अवघ्या महाराष्ट्राचे लक्ष कणकवली नगरपंचायतच्या निकालाकडे लागले आहे.
या निवडणुकीतील सर्वात लक्षवेधी बाब म्हणजे, राज्यात सत्तेत सहभागी असलेला शिंदे गटातील शिवसेना पक्षही शहरविकास आघाडीत सहभागी झाला असून, या आघाडीचे नेतृत्व थेट शिवसेनेचे आमदार निलेश राणे यांनी केले आहे. सत्तेत असतानाच भाजपविरोधात उघडपणे भूमिका घेतल्याने या निवडणुकीला विशेष राजकीय महत्त्व प्राप्त झाले आहे. परिणामी ही निवडणूक केवळ कणकवलीपुरती मर्यादित न राहता, राणे कुटुंबातील राजकीय ताकद आणि प्रभाव यांचीही कसोटी मानली जात आहे.
दुसरीकडे, पालकमंत्री नितेश राणे यांनी कणकवलीत ठाण मांडत भाजपचा प्रचार स्वतः हातात घेतला. विरोधकांची एकजूट रोखण्यासाठी भाजपने पूर्ण ताकद लावली. प्रचाराच्या शेवटच्या टप्प्यात सभांपासून सोशल मीडियापर्यंत भाजपची आक्रमक रणनीती पाहायला मिळाली. विशेष म्हणजे, निवडणूक निकाल जाहीर होण्याआधीच दोन्ही गटांकडून विजयाचे दावे सोशल मीडियावर खुलेआम सुरू झाले असून, गुलाल आणि फटाक्यांची जोरदार तयारी करण्यात आली आहे.
या निवडणुकीसाठी ७९.७१ टक्के इतके विक्रमी मतदान झाले आहे. नगरपंचायतीच्या निवडणुकीत इतक्या मोठ्या प्रमाणावर मतदान होणे, हे जनतेतील उत्सुकता आणि अस्वस्थतेचे द्योतक मानले जात आहे. वाढलेला मतदानाचा टक्का नेमका कोणाच्या पथ्यावर पडणार, हा प्रश्न आता सर्वांनाच पडला आहे. राजकीय जाणकारांच्या मते, जास्त मतदान हे सत्तेविरोधी लाटेचे संकेत असू शकतात, मात्र भाजपची संघटनात्मक ताकदही निर्णायक ठरू शकते.
नगराध्यक्षपदासाठी यंदा त्रिकोणी लढत रंगली आहे. शहरविकास आघाडीअंतर्गत क्रांतिकारी विचार पक्षाकडून संदेश पारकर, भाजपकडून समीर नलावडे, तर लोकराज्य जनता पार्टीकडून गणेशप्रसाद पारकर हे उमेदवार रिंगणात आहेत. नगराध्यक्षपदाचा निकाल संपूर्ण नगरपंचायतीतील सत्तेचे गणित ठरवणारा ठरणार आहे.
नगरसेवकपदाच्या १७ जागांसाठी तब्बल ३६ उमेदवार निवडणूक रिंगणात उतरले होते. प्रत्येक प्रभागात चुरशीची आणि थेट लढत पाहायला मिळाली. बहुतांश प्रभागांमध्ये भाजप आणि क्रांतिकारी विचार पक्ष आमनेसामने होते, तर काही ठिकाणी आप आणि अपक्ष उमेदवारांनीही समीकरणे बिघडवण्याची भूमिका घेतली आहे.
प्रभाग क्रमांक १ मध्ये क्रांतिकारी विचार पक्षाचे तेजस राणे आणि भाजपचे राकेश राणे यांच्यात थेट लढत झाली. प्रभाग क्रमांक २ मध्ये भाजपच्या प्रतीक्षा सावंत आणि क्रांतिकारी विचार पक्षाच्या साक्षी आमडोसकर आमनेसामने होत्या. प्रभाग क्रमांक ३ मध्ये भाजपचे स्वप्नील राणे, क्रांतिकारी विचार पक्षाचे सुमित राणे आणि आपचे संजय पवार यांच्यात तिरंगी लढत झाली. प्रभाग क्रमांक ४ मध्ये माधवी मुरकर विरुद्ध जुई मुरकर अशी चुरस होती.
प्रभाग क्रमांक ५ ते ८ मध्येही भाजप आणि क्रांतिकारी विचार पक्षामध्ये थेट मुकाबले झाले. प्रभाग क्रमांक ९ मध्ये भाजपच्या मेघा सावंत, क्रांतिकारी विचार पक्षाच्या रिना जोगळे आणि अपक्ष मधुरा मालंडकर यांच्यात लढत रंगली. प्रभाग क्रमांक १० ते १२ मध्येही चुरशीच्या लढती झाल्या.
प्रभाग क्रमांक १३ मध्ये भाजपचे माजी उपनगराध्यक्ष गणेश उर्फ बंडू हर्णे आणि क्रांतिकारी विचार पक्षाचे जयेश धुमाळे आमनेसामने होते. प्रभाग क्रमांक १४ मध्ये भाजपचे शहराध्यक्ष अण्णा कोदे आणि क्रांतिकारी विचार पक्षाचे राधाकृष्ण उर्फ रुपेश नार्वेकर यांच्यात सामना झाला. प्रभाग क्रमांक १५ व १६ मध्येही थेट लढती झाल्या. विशेष लक्ष वेधून घेतले आहे ते प्रभाग क्रमांक १७, जिथे राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष अबिद नाईक आणि क्रांतिकारी विचार पक्षाकडून शिवसेना ठाकरे गटाच्या युवासेनेचे जिल्हाप्रमुख सुशांत नाईक यांच्यात लढत झाली आहे. आता सर्वांचे लक्ष २१ डिसेंबर रोजी होणाऱ्या मतमोजणीकडे लागले आहे.
कमळ की नारळ? सत्ता की बदल?
कणकवलीचा कौल उद्या स्पष्ट होणार असून, या निकालाचे पडसाद केवळ कणकवलीतच नव्हे, तर संपूर्ण महाराष्ट्राच्या राजकारणात उमटण्याची शक्यता आहे.