घाटकोपर जॉली जिमखाना येथे १० ते १२ जानेवारीदरम्यान महाराष्ट्र राज्य मानांकन कॅरम स्पर्धा
मुंबई : घाटकोपर जॉली जिमखाना, महाराष्ट्र कॅरम असोसिएशन (MCA) आणि मुंबई उपनगर जिल्हा कॅरम संघटना यांच्या संयुक्त विद्यमाने तिसरी घाटकोपर जॉली जिमखाना महाराष्ट्र राज्य मानांकन कॅरम स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. ही स्पर्धा दि. १० ते १२ जानेवारी २०२६ या कालावधीत घाटकोपर जॉली जिमखाना, फातिमा हायस्कूल समोर, विद्या विहार (पश्चिम), घाटकोपर, मुंबई – ४०००८६ येथे पार पडणार आहे.
या राज्यस्तरीय मानांकन स्पर्धेत महाराष्ट्रातील नामवंत तसेच उदयोन्मुख कॅरम खेळाडू सहभागी होणार असून, स्पर्धेमुळे खेळाडूंना आपली गुणवत्ता सिद्ध करण्याची संधी मिळणार आहे.
स्पर्धेसाठीचे प्रवेश अर्ज महाराष्ट्र कॅरम असोसिएशनच्या कार्यालयात दि. ०२ जानेवारी २०२६ पर्यंत स्वीकारले जाणार असल्याची माहिती आयोजकांकडून देण्यात आली आहे. इच्छुक खेळाडूंनी वेळेत अर्ज सादर करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
स्पर्धेसंबंधी सविस्तर माहिती व प्रवेश अर्ज महाराष्ट्र कॅरम असोसिएशनच्या अधिकृत संकेतस्थळावर उपलब्ध असून, कॅरमप्रेमी व खेळाडूंमध्ये या स्पर्धेबाबत उत्सुकता निर्माण झाली आहे.


